मुंबई : दिग्दर्शकाच्या भूमिकेतील प्रसाद ओक यांचा पहिलाच सिनेमा 'कच्चा लिंबू'... प्रदर्शनाआधीच हा सिनेमा आपल्याकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमातील 'माझे आई-बाबा' हे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलंय. पती - पत्नी म्हणून एकमेकांसोबत एकरूप झालेल्या त्या दोघांचा बाळाच्या जन्मासोबत आई बाबा म्हणून जन्म होतो. आपल्या मुलाबरोबर मुल होऊन खेळणारे, चालायला शिकताना, रांगताना धडपडल्यावर सदैव मुलाच्या पाठिशी असणारे आई-बाबा नंतर पुढे आयुष्याची लढाई लढतानासुद्धा आपल्या बाळाच्या पंखात बळ येईपर्यंत त्याच्या पाठिशी ठाम उभे असतात. पण काही मुलं ही 'स्पेशल' असतात, त्यांच्यातले मूलपण कधी संपताच नाही! या 'स्पेशल' मुलांना घडवणारे त्यांचे आई-बाबाही तितकेच स्पेशल असतात. अशाच 'स्पेशल' आई बाबांसाठी एक स्पेशल गाणं या सिनेमात दिसतंय. 


कोणत्याही हिशोबाच्या पलीकडे असणाऱ्या या आई बाबांना शब्दांच्या कोंदणात बसवण्याचे आव्हान पेललंय कवी संदीप खरे यांनी... आणि या गाण्याला संगीत दिलंय संगीतकार राहुल रानडे यांनी... गायक अवधूत गुप्ते यांच्या आवाजातील हे गाणं तुम्हालाही आवडेल... नक्की पाहा... 



हा सिनेमा ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. सोनाली कुलकर्णी, रवी जाधव, मनमीत पेम, सचिन खेडेकर यांच्या या सिनेमात प्रमूख भूमिका आहेत.