रागाच्या भरात गुरु खरंच राजीनामा देणार का?
झी मराठी वरील लोकप्रिय मालिका `माझ्या नवऱ्याची बायको` ही मालिका आता खरी रंगात आली आहे, असे म्हणायाला हरकत नाही.
मुंबई : झी मराठी वरील लोकप्रिय मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका आता खरी रंगात आली आहे, असे म्हणायाला हरकत नाही. कारण आता गेम दोन्ही बाजूंनी आहे. पूर्वी फक्त गुरुच राधिकाला त्रास देत असे. पण आता राधिकाही त्याला पुरेपूर उत्तर देत आहे.
राधिका-गुरुनाथच्या घटस्फोटाचा महासंग्राम कोर्टात चांगलाच रंगत आहे. जवळजवळ केस राधिकाच्या बाजूने झुकत आहे. पण कपटी, खोटा गुरुनाथ अजूनही हार मानत नसून आईचे मन आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे. गुरु-शनायाची ही शक्कल बहुतेक यशस्वी होईल, असे वाटत आहे. कारण आईचे मन आपल्या मुलासाठी व्याकूळ होत आहे. त्याचबरोबर राधिकासोबत बाहेर जेवायला जाण्यासही आई नकार देतात. याचा अर्थ बहुतेक त्या गुरुला मदत करणार. आईच्या मदतीवर गुरु ही केस जिंकणार का? की तोंडावर पडणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
त्याचबरोबर गुरुच्या ऑफिसमध्ये त्याचे दोन्ही बॉस चांगलेच संतापले असून ते त्याला चांगलेच धारेवर धरत आहे. या सगळ्या कटकटीत गुरु राजीनामा देणार असे बोलतो. मग गुरु खरंच राजीनामा देणार का? आणि दिला तर मग शनाया गुरुसोबत राहणार का? त्यांचे प्रेमाचे नाते टिकेल का? हे प्रश्न शनायाचा स्वभाव बघता सामान्यपणे पडतातच.
आता गुरु अधिकच संकटात सापडणार का? राधिका पण नाही आणि शनाया पण नाही, अशी गुरुची स्थिती होणार?