COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : कोरोनाच्या संकटात सारा देश भरडला गेलाय. डॉक्टर, पोली, आरोग्य कर्मचारी हे कोरोना वॉरिअर्स आपले कर्तव्य नेटाने पार पाडतायत. यांच्यासोबत सेलिब्रिटी, सामाजिक संस्था, तरुण वर्ग देखील मदतीचे हात पुढे करत आहे. परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयातील एम.डी नाट्यांगणाच्या ग्रुपने ऑनलाईन नाट्य जत्रा आयोजित केलीय. या नाट्य जत्रेतून निधी गोळा करण्यात येणार असून रंगमंच कामगारांना आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. 


नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला सेटच्या लेवलपासून ते लाइट्स, म्युझिक अशा गरजेच्या गोष्टींसाठी रंगमंच कामगारांचा महत्वाचा सहभाग असतो.  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरु झालेल्या लॉकडाऊनचा परिणाम या रंगमंच कामगारांवरही झालायं. एम.डी नाट्यांगणातील आजीमाजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन त्यांच्यापर्यंत आर्थिक मदत पोहोचवली. पण कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन दिवसेंदिवस वाढतानाच दिसतोय. थिएटर्सही बंद असल्याने रंगमंच कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. 


हे कामगार आमच्या कुटुंबाचा भाग असल्याच्या भावनेतून एम.डी नाट्यांगणने ऑनलाईन नाट्य जत्रा आयोजित केलीय. यामध्ये एम.डी महाविद्यालयासोबत इतर महाविद्यालयातील कलाकार आणि संस्थांनी देखील पुढाकार घेतलाय. हे सर्व मिळून १० एकांकीका २८ ते ३० मे दरम्यान एम.डी नाट्यांगणच्या यूट्यूब पेजवर दाखवल्या जाणार आहेत. या एकांकीका पाहून प्रेक्षक पोचपावती म्हणून जी रक्कम देतील ती रंगमंच कामगारांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. 



नाट्य जत्रेत सहभागी व्हा आणि रंगमंच कामगारांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी पुढे या असे आवाहन लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रल्हाद कुडतरकर याने केले आहे.