मुंबई : बॉलिवूडमध्ये पुन्हा मी-टूचं वादळ घोंघाऊ लागलंय. प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यावर सहदिग्दर्शिका म्हणून काम करणाऱ्या महिलेने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केलाय. संजू चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी हिरानींनी लैंगिक छळ केल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय. महिलेने केलेल्या आरोपांनुसार, हिरानी यांनी अश्लिल शेरेबाजी केली. त्यानंतर एप्रिलमध्ये लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. याला विरोध केल्यानंतर चित्रपट काढून घेतला जाईल अशी धमकीही हिराणी यांनी दिल्याचे पीडित महिलेचं म्हणणं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्या प्रकरणाची माहिती संजू चित्रपटाचे सहनिर्माते विधू विनोद चोप्रा, त्यांची पत्नी अनुपमा चोप्रा, त्यांची बहिण शेली चोप्रा आणि लेखक अभिजात जोशी यांना मेल करून दिल्याचं पीडित महिलेनं सांगितलं आहे.


काय आहे महिलेच्या मेलमध्ये?


हिरानी यांनी ९ एप्रिल २०१८ साली माझ्याबद्दल अश्लिल शेरेबाजी केली. यानंतर त्यांनी कार्यालयात आणि घरी माझ्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मला नोकरी टिकवायची होती, म्हणून मला शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. मी विरोध केला असता तर माझं भविष्य उद्धवस्त झालं असतं, असा मेल या पीडित महिलेनं केला आहे.


हिरानींनी आरोप फेटाळले


दरम्यान राजकुमार हिरानी यांचे वकील आनंद देसाई यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. हिरानींची प्रतिमा मलीन करण्यासाठी हे आरोप लावले जात असल्याची प्रतिक्रिया आनंद देसाई यांनी दिली आहे.