सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असणारा 'टायगर 3' पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला असून, प्रेक्षकांना तो प्रचंड आवडला आहे. चित्रपटातील अॅक्शन सीन्सचं प्रचंड कौतुक होत असून, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड तोडेल असे अंदाज व्यक्त करत आहेत. दरम्यान चित्रपटातील एक सीन सध्या प्रचंड चर्चेत आहेत, ज्यामध्ये कतरिना कैफ टॉवेल गुंडाळून फायटिंग करत आहे. कतरिनासह या सीनमध्ये हॉलिवूड अभिनेत्री मिशेल ली दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉलिवूड अभिनेत्री मिशेल ली आपल्या अॅक्शन सीन्ससाठी प्रसिद्ध आहे. 'ब्लॅक विडो' 'पायरेट्स ऑफ द कॅरेबियन', 'बुलेट ट्रेन' आणि 'वेनोम' या मोठ्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. सध्या ती 'टायगर 3' चित्रपटामुळे चर्चेत आहे. टायगर 3 चित्रपटात तिने कतरिना कैफसह टॉवेल सीन दिला आहे. या सीनची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. दरम्यान, हा सीन कसा शूट केला याबद्दल मिशेलने खुलासा केला आहे. 


'टायगर 3' च्या ट्रेलरमधील टॉवेल सीन सर्वाधिक चर्चेचा विषय झाल्याचं आपल्याला आश्चर्य वाटत नसल्याचं मिशेलने सांगितलं आहे. आम्ही हा सीन शूट करण्याआधी तब्बल 2 आठवडे सराव केला होता असं तिने सांगितलं आहे. 


मिशेलने सांगितलं की, "मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. जेव्हा हा सीन शूट केला जात होता तेव्हाच तो फार मोठा होईल याची जाणीव झाली होती. आम्ही काही आठवडे प्रशिक्षण घेतलं, नंतर सराव करत तो शूट केला. सेट फार भव्य होता आणि शुटिंग करताना फार मजाल आली. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे," असं मिशेलने सांगितलं आहे.



कतरिनाचं कौतुक


मिशेलने कतरिनाचं कौतुक केलं आहे. सीन चांगला व्हावा यासाठी ती काही करण्यास तयार असते असं तिने सांगितलं आहे. "या सीनसाठी माझ्याइतकीच कतरिनाही उत्सुक होती. प्रत्येक गोष्ट नीट व्हावी यासाठी तिने मेहनत घेतली आहे. तिला कोरिओग्राफीचा अनुभव असल्याने तिच्यासह काम करणं सोपं होतं. आम्ही एकत्र खूप घाम गाळला," असं मिशेलने सांगितलं आहे. 


हा शूट करताना टॉवेल सांभाळणं सर्वात आव्हानात्मक होतं असं मिशेलने सांगितलं आहे. हे टॉवेल शिवलेले असल्याने, आम्हाला फार मदत झाली असं तिने सांगितलं. 


'टायगर 3' मध्ये सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहेत. आदित्य चोप्राने या चित्रपटाची निर्मिती केली असून, मनिष शर्माने दिग्दर्शन केलं आहे. 12 नोव्हेंबरला दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट यशराज फिल्म्स प्रोडक्शनच्या स्पाय युनिव्हर्सचा भाग आहे.