शशी थरूर यांंच्या ट्विटला मानुषीने दिलं सडेतोड उत्तर
शनिवारी मानुषी छिल्लर या भारतीय युवतीने ` मिस वर्ल्ड` या किताबावर आपलं नावं कोरलं.
मुंबई : शनिवारी मानुषी छिल्लर या भारतीय युवतीने ' मिस वर्ल्ड' या किताबावर आपलं नावं कोरलं.
भारताकडे सुमारे १७ वर्षांनंतर ' मिस वर्ल्ड' हा किताब आला. त्यामुळे भारतीय आनंदामध्ये होते. अशातच शशी थरूर यांनी एक ट्विट केले आणि पुन्हा ट्विटरवर वाद रंगला.
शशी थरूर यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीवरील अपयश ठळक करण्यासाठी मानुषी छिल्लरच्या आडनावाचा वापर केला होता. मात्र ट्विटरवर अनेकांनी संतापजनक प्रक्रिया दिल्यानंतर शशी थरूर यांनी माफी मागितली.
अनेक ट्विटरकरांप्रमाणेच अनुपम खेर यांनीदेखील शशी थरूर यांच्या ट्विटचा समाचार घेतला होता. मात्र त्यानंतर आता थेट मानुषीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मानुषीने ट्विट करताना छिल्लर या नावाचा अपभ्रंश केलेला असला तरीही त्यामधील सकारात्मक बाजू बघा अशा आशयाचं ट्विट केलं आहे. ' मी अपसेट नाही कारण चिल्लर मध्येही 'चिल' हा शब्द आहे. असं तिनं म्हटलं आहे.
शनिवारी चीनमध्ये २०१७ च्या मिस वर्ल्डचा अंतिम सोहळा पार पाडला. यामध्ये 20 वर्षीय मानुषीने मिस वर्ल्ड हा किताब जिंकला. यापूर्वी प्रियांका चोप्राने मिस वर्ल्डचा किताब पटकवला होता. मानुषी ही मेडिसीनची विद्यार्थिनी आहे. तिला भविष्यात कार्डिएक सर्जन होण्याची इच्छा आहे.