मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या वडिलांचे मंगळवारी रात्री मुंबईत निधन झाले. बसंत कुमार चक्रवर्ती हे ९५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. अखेर काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. मात्र, मिथुन चक्रवर्ती यांना वडिलांचे अंत्यदर्शन घेता आले नाही.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिथुन चक्रवर्ती लॉकडाऊनमुळे सध्या बंगळुरुत अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी ते एका शुटिंगसाठी बंगळुरूला गेले होते. मात्र, यानंतर लॉकडाऊन घोषित झाल्याने मिथुन चक्रवर्ती तेथेच अडकून पडले आहेत. यामुळे त्यांना वडिलांचे अंत्यदर्शनही घेता आले नाही. 

चक्रवर्ती कुटुंबीयांच्या माहितीनुसार, मंगळवारी बसंत कुमार यांची तब्येत अचानक खालावली. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. बसंत कुमार यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याने त्यांची प्रकृती आणखी खालावत गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 



मंगळवारी रात्री निधन झाल्यानंतर बसंत चक्रवर्ती यांच्यावर तात्काळी अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या मिथुन यांचा मोठा मुलगा मिमोह मुंबईमध्ये आहे. मिथुन चक्रवर्तीही लवकरच मुंबईला येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 
दिग्गज अभिनेत्री रितुपर्णा सेन गुप्ता यांनी ट्विटरद्वारे मिथुन यांच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली. मिथुनदा यांच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, असे ट्विट त्यांनी  केले.