बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना कोलकातामधील अपोलो या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिथुन त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता त्यांच्या प्रकृतीची अपडेट समोर आली आहे. मिथुन चक्रवर्ती यांचा मोठा मुलगा मिमोह चक्रवर्ती आणि सून मदालसा शर्मा यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिथुन चक्रवर्ती यांचा मोठा मुलगा मिमोह चक्रवर्तीने 'इंडियन एक्सप्रेस'शी बोलताना वडिलांच्या तब्येतीबद्दल माहिती दिली. "माझे वडील पूर्णपणे ठीक आहेत. हे फक्त रुटीन चेकअप होते. त्यांची प्रकृती ठणठणीत आहे", असे मिमोह चक्रवर्ती म्हणाला. तर त्यांची सून आणि अभिनेत्री मदालसा शर्मा हिनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. "माझे सासरे पूर्णपणे ठीक आहेत. त्यांना फक्त रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तुम्हाला मिळालेली माहिती पूर्णपणे खोटी आहे", असे मदालसा शर्माने म्हटले आहे. 


'पीटीआय' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मिथुन चक्रवर्ती यांचा एमआरआय रिपोर्ट काढण्यात आला आहे. त्याबरोबरच त्यांच्या अन्य काही चाचण्याही करण्यात आल्या आहेत, अशी माहिती कोलकातामधील रुग्णालयाने दिली आहे. मिथुन यांना सकाळी 10.30 च्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांचा एमआरआयचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. त्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. मिथुन हे कोलकातामध्ये शास्त्री या त्यांच्या आगामी चित्रपटाचे शूटींग करत होते. 



मिथुन चक्रवर्ती यांना नुकतंच पद्म भूषण या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पद्म भूषण मिळाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की "हा पुरस्कार मिळाल्यानं मला फार आनंद होतं आहे. मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. मी कधीच कोणाकडे माझ्यासाठी काही मागितली नाही. काही न मागता जेव्हा आपल्याला काही मिळतं त्याचा आनंदा हा शब्दात व्यक्त करू शकत नाही. मला खूप आनंद झाला. इतकं प्रेम आणि सन्मान देण्यासाठी सगळ्यांचे आभार. मला मिळालेल्या या पुरस्काराला मी माझ्या चाहत्यांना डेडिकेट करतो. हा अवॉर्ड जगभरात असलेल्या माझ्या चाहत्यांसाठी आहे आणि मी त्यांचे आभार मानतो. ज्यांनी मला खूप प्रेम दिलं. त्यामुळे माझा हा पुरस्कार सगळ्या चाहत्यांना जातो." 


दरम्यान मिथुन चक्रवर्ती यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या Kabuliwala  या बंगाली चित्रपटात ते दिसले होते. तर 2022 मध्ये त्यांनी विवेक अग्निहोत्री यांच्या 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यांनी माजी IAS अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. त्यासाठी त्यांना बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.