ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. 10 फेब्रुवारीला एका खासगी रुग्णालयात मिथुन चक्रवर्ती यांना दाखल कऱण्यात आलं होतं. 73 वर्षीय मिथुन चक्रवर्ती यांनी छातीत वेदना होत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यादरम्यान भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती अत्यंत ठीक असून, ते लवकरच आपल्या आगामी चित्रपटांच्या शुटिंगला सुरुवात करतील अशी माहिती दिली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मिथुन चक्रवर्ती यांची एमआरआयसह अनेक वैद्यकीय चाचण्या झाल्या. आदल्या दिवशी वरिष्ठ डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेतला होता. यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


दरम्यान मिथुन चक्रवर्ती यांनी रुग्णालयातून बाहेर पडताना प्रसारमाध्यमांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, "खरंतर काहीच समस्या नाही. मी पूर्णपणे ठीक आहे. मला माझ्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. पाहूयात पुढे काय होतं. मी लवकरच पुन्हा काम करण्यास सुरुवात करेन, कदाचित उद्यापासूनच". 


दरम्यान यावेळी त्यांनी आपण आरोग्याची नीट काळजी घेत नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ओरडा पडल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, "नरेंद्र मोदींनी मला रविवारी फोन केला होता. यावेळी त्यांनी मला आरोग्याची नीट काळजी घेत नसल्याने खडसावलं". याआधी भाजपा खासदार दिलीप घोष यांनी सकाळी त्यांची भेट घेतली होती.


मिथुन चक्रवर्ती यांना नुकताच प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यावर आनंद व्यक्त करताना मिथुन म्हणाले होते की, "हा पुरस्कार मिळाल्याने मला आनंद झाला आहे. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. मी कधीच कोणाकडे माझ्यासाठी काहीही मागितलं नाही. न मागता काहीतरी मिळाल्याचा आनंद वाटतो. ही एक अतिशय आश्चर्यकारक आणि वेगळी अनुभूती आहे. मला खूप बरं वाटत आहे".


2023 मध्ये मिथुन चक्रवर्ती सुमन घोष यांच्या सुपरहिट बंगाली चित्रपट 'काबुलीवाला'मध्ये दिसले होते. 2022 मध्ये, त्यांनी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात निवृत्त आयएएस अधिकाऱ्याच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा 'फिल्मफेअर पुरस्कार'ही मिळाला होता. मिथुन चक्रवर्ती यांनी हिंदी, बंगाली, भोजपूर, तामिळ अशा अनेक भाषांसह एकूण 350 चित्रपटांमध्ये काम केलं आहे.