हर हर महादेव !शिवप्रेमी राज ठाकरेंच्या आवाजात घुमणार महागर्जना !
झी स्टुडिओजचा दिवाळीचा विशेष नजराणा
मुंबई : हर हर महादेव... मराठी मनाला चेतवणारी, आपल्यात स्फुलिंग निर्माण करणारी, रक्त सळसळवणारी गर्जना. सह्याद्रीच्या कडेकपारातून, सिंधुदुर्गाच्या लाटांमधून, देवगिरीच्या अभेद्य भिंतीमधून ते अटकेपार फडकवणाऱ्या भगव्या ध्वजापर्यंत जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याची मोहोर उमटली तिथे तिथे या गर्जनेने आसमंत दणाणून सोडला. (MNS Chief Raj Thackeray dubbed for Zee Studio Har Har Mahadev Movie )
या गर्जेनशिवाय मराठ्यांचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक लढाईत ही गर्जना म्हणजे लढण्याचं बळ देणारी जणू उर्जाच होती. हीच ऊर्जा आता परत एकदा अनुभवायला मिळणार आहे कारण ही महागर्जना आता मोठ्या पडद्यावरून एका भव्य दिव्य सिनेमाच्या माध्यमातून घुमणार आहे.
आजवर प्रेक्षकांना एकाहून एक सरस चित्रपट देणाऱ्या झी स्टुडिओजने या दिवाळीत प्रेक्षकांसाठी एक खास नजराणा आणला आहे. अभिजित शिरीष देशपांडे लिखित- दिग्दर्शित, झी स्टुडिओज आणि गणेश मार्केटिंग फिल्म्स निर्मित 'हर हर महादेव' हा महासिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
या चित्रपटाचा एक विशेष आवाज लाभलेला खास टिझर आज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मराठीची मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेलं नाव म्हणजे राज ठाकरे. त्यांच्याच धीरगंभीर आवाजाने सजलेली 'हर हर महादेव' या चित्रपटाची ही विशेष झलक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
जेव्हा मायमाऊलीची बेअब्रू आणि मंदिराला तडा गुन्हा नव्हता
जेव्हा सह्याद्रीला कणा आणि
मराठीला बाणा नव्हता..
ही ३५० वर्षानंतरच्या पहाटफुटीची गोष्ट आहे..
ही अठरापगड आरोळ्यांची ,
आणि माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे..
हर हर महादेव !
या अशा प्रेरणादायी वाक्यांनी सज्ज असलेला हा टिझर प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. आजवर झी स्टुडिओजने एकाहून एक दर्जेदार कलाकृती आपल्या प्रेक्षकांना दिल्यात. याच पंक्तीत आता 'हर हर महादेव' हे आणखी एक नाव दिमाखदारपणे सामील होणार आहे.
नुकतंच महाराष्ट्र राज्य सरकारने काही निवडक शहरांमध्ये चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याची महत्त्वाची घोषणा केली. याच आनंददायी घोषणेचं औचित्य साधून प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी 'हर हर महादेव'
या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. शिवप्रेमी राज ठाकरे यांच्या दमदार आवाजाने सजलेला हा टिझर चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करेल यात शंकाच नाही.