Adipurush ला `मनसे` पाठिंबा; अमेय खोपकर जे म्हणालेत ते तुम्हाला पटतंय का?
रामायणाचे संदर्भ घेत साकारण्यात आलेल्या या चित्रपटाच्या कथानकाला कलेची जोड देताना दिग्दर्शकानं घेतलेलं स्वातंत्र्य अनेकांनाच रुचलेलं नाही.
Adipurush Controversy : अभिनेता प्रभास (Prabhas), सैफ अली खान (Saif ali khan), अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti sanon)यांच्या भूमिका असणारा 'आदिपुरुष' (Adipurush) हा चित्रपट त्याची पहिली झलक सर्वांसमोर आल्या क्षणापासून टीकेचा धनी झाला आहे. रामायणाचे संदर्भ घेत साकारण्यात आलेल्या या चित्रपटाच्या कथानकाला कलेची जोड देताना दिग्दर्शकानं घेतलेलं स्वातंत्र्य अनेकांनाच रुचलेलं नाही.
रामाच्या (Ram) अंगावर असणारी वस्त्र चामड्याची कशी इथपासून रावणाची (Ravana) भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खानमध्ये आणि खिलजी, चंगेज खान किंवा औरंगजेबामध्ये काहीच फरक नसल्याचा सूर अनेकांनीच आळवला. पौराणिक पात्र वेगळ्या पद्धतीनं सादर करण्याचा प्रयोग दिग्दर्शकानं केला असला तरीही तो इतरांना मात्र रुचलेला दिसत नाही.
अधिक वाचा : दसरा मेळाव्यासाठी गेला आणि परतलाच नाही; रायगडमधील शिंदे समर्थक बेपत्ता?
चित्रपटाला एकिकडून बहुताश वर्गांकडून विरोध होत असतानाच मनसेच्या (MNS) चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मात्र ट्विट करत चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. 'ओम राऊत (Om Raut) या दिग्दर्शकाने यापूर्वी लोकमान्य आणि तान्हाजी या कलाकृतींमधून इतिहासाची अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ओम राऊत यांनी साकारलेला भव्य लाईट ॲंड साऊंड शो आजही दिमाखात सुरु आहेट, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.
ओम राऊत याच्या आगामी ‘आदिपुरुष’ टीझरवरुन (Adipurush teaser video) टीका होणं हे दुर्दैवी आहे, असं म्हणत दिग्दर्शकासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची प्रचिती चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच येईल असा विश्वास व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा ‘आदिपुरुष’ निर्मितीला पूर्ण पाठिंबा आहे, असं त्यांनी जाहीर केलं.