श्वेता वाळंज, झी मीडिया, मुंबई : 'पहिल्यांदा रेड कार्पेटवर पाऊल ठेवलं तेव्हा मनात भीती होती. आपलं काही चुकलं तर लोक काय बोलतील याची हुरहुर असायची. पण मला लोकांसमोर खूप छान सादर करायचं होतं आणि मी ते करून दाखवलं!'... आपल्या पंखांना बळ देवून उंच भरारी घेणारी मुंबईची मराठमोळी पोर्णिमा बुद्धिवंत आज मॉडलिंग क्षेत्रात भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर तिच्या नावावर अनेक पुरस्कारांची  नोंद देखील आहे. 'Miss Tourism & Culture Universe India 2019' त्यामधील एक पुरस्कार. मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलीनं मर्यादेबाहेर जावून विचार करणं आणि ते क्षण जगणं हे पोर्णिमासाठी एक स्वप्नचं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयुष्यात काहीतरी वेगळं करून दाखवण्याची इच्छा प्रत्येकाची असते पण आपल्या जिद्दीच्या बळावर ती इच्छा पूर्ण करणारे फार कमी असतात. सामान्य घरातून आलेल्या पौर्णिमासाठी एवढामोठा प्रवास फार सोपा नव्हता. आपण या निसर्गाची सर्वात सक्षम घडण आहोत आणि आपल्या सर्वांना समान संधी उपलब्ध व्हायला हव्यात. प्रत्येकाने आपल्या मुलींना 'नेतृत्व' करायला शिकवायला हवं असं पोर्णिमा सांगते.  



१२वी नंतर तीला पत्रकारीतेत करियर करायचं होतं पण घरच्यांच्या नकारामुळे तिला ते पूर्ण करता आले नाही. शिवाय तिला चित्रकलेची देखील फार आवड पण परिस्थितीमुळे असे छंद जोपसणे तिच्यासाठी फार खर्चिक होते. वडील स्कूल बस चालक असल्यामुळे एकाच्या उत्पन्नात पूर्ण कुटुंबाचा उदर्निवाह होणे फार अवघड होते. 


त्यामुळे आई धुणीभांडी करत असे. जर आई कधी आजारी पडली तर पोर्णिमा आणि लहान बहीण घरकाम करण्यासाठी जायच्या.कोणतंही काम हे लहान नसतं, हे बोलण्यासाठी जेवढं सोपं आहे तेवढं करणं मात्र फार कठीण असल्याचं पोर्णिमा सांगते. गरीब परिस्थिती, चार भावंडांचं शिक्षण, अशा परिस्थितीत पोर्णिमाने आपलं आर्किटेक्ट बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. सध्या ती मॉडल म्हणून उदयास येत असली तरी, आर्किटेक्चर म्हणून कार्यरत आहे. 


'ज्या कामातून आपल्याला आनंद मिळतो ते त्यानं करावं' हा नव्या वर्षाचा संकल्प वाटतो. क्षेत्र कोणतेही असो प्रत्येक मुलीने त्यात 'नेतृत्व' करायला हवं असं पोर्णिमा सांगते.