...म्हणून दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना धक्काबुक्की
मुळशीतील गुंडगिरी या चित्रपटानंतर संपेल असा दावा करण्यात येत होता. पण....
मुंबई : गुन्हेगारी विश्वावर भाष्य करणाऱ्या 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटामुळे सध्या बऱ्याच विषयांना वाचा फुटल्याचं पाहायला मिळत आहे. किंबहुना रविवारी तरडे यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोडही करण्यात आल्याची माहितीही समोर आली. ज्यानंतर त्यांनाही मारहाण करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं.
सदर प्रकरणी होणाऱ्या चर्चा आणि एकंदर वातावरण पाहता खुद्द करडे यांनीच त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हि़डिओ पोस्ट केला. ज्यामध्ये त्यांनी कार्यालयात नेमकं काय घडलं होतं, याविषयीची माहिती दिली.
आपल्या कार्यालात काही इसमांनी तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं. त्यासोबतच आपल्याला कोणत्याही प्रकारची मारहाण करण्यात आलेली नाही हेसुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. बऱ्याच ठिकाणी आपल्याला मारहाण झाल्याचं वृत्त चर्चेत असल्यामुळेच या फवांना पूर्णविराम देण्यासाठी म्हणून त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला.
दरम्यान, प्रवीण तरडे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमाराला पुण्यातल्या पौड इथल्या कार्यालयामध्ये बसले असताना, चार ते पाच जणांनी कार्यालयात घुसून तोडफोड केली अशा चर्चांनी जोर धरला होता.
गुन्हेगारी जगतावर भाष्य करणारा 'मुळशी पॅटर्न' हा मराठी चित्रपट मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. मुळशीतील गुंडगिरी या चित्रपटानंतर संपेल असा दावा करण्यात येत होता. पण, आता याच चित्रपटामुळे वातावरण गंभीर झाल्याचं पाहायला मिळत आहे.