मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचं नाव म्हणजे एनटीआर. त्यांच्याच आयुष्यावर साजरा केला जाणारा चित्रपट एनटीआर कथानायकुडू याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. नंदमुरी तारका राम राव यांचा एका अभिनेत्यापासून सुरु झालेला प्रवास  एका राजकीय नेत्यापर्यंत येऊन कसा थांबतो याचं चित्रण या चित्रपटातून करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा प्रवास नेमका कसा होता, याचीच झलक ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. नंदमुरी बालकृष्ण या चित्रपटात एनटीआर यांची व्यक्तीरेखा साकारत असून, अभिनेत्री विद्या बालन यात एनटीआर यांची पत्नी बसवतारकम यांच्या भूमिकेत झळकत आहे. आपल्या पतीच्या प्रत्येक निर्णयात, त्याच्या आयुष्याती प्रत्येक वळणावर साथ देणारी पत्नी विद्या या चित्रपटात साकारत आहे. 


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी, तत्कालीन राजकारण आणि एखाद्या कलाकाराला देवत्व प्राप्त होण्यापर्यंतचा रंजक प्रवास एनटीआर यांच्या बायोपिकमधून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या चित्रपटात बरेच कलाकार झळकणार असून, एनटीआर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या भूमिकेत ते झळकणार आहेत. अभिनेत्री रकुल प्रीत यात अभिनेत्री श्रीदेवी यांची व्यक्तीरेखा साकारत आहे. तर, बाहुबली फेम अभिनेता राणा डग्गुबती यात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची भूमिका साकारत आहेत. 



दोन भागांमध्ये हा बायोपिक प्रदर्शित होणार आहे. ज्याचा पहिला भाग, 'एनटीआर कथानाकुडू' ९ जानेवारी २०१९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तर,  'एनटीआर महाकथानायकुडू' ९ फेब्रुवारी २०१९ ला प्रदर्शित होईल. क्रिश जगरलामुडी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, एका अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीचा प्रवास प्रेक्षकांपर्यंत आणला आहे.