चित्रपट : एक लडकी को देखा तो ऐसा लगा
दिग्दर्शक : शैली चोप्रा-धर
कलाकार : सोनम कपूर, राजकुमार राव, अनिल कपूर, जुही चावला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई  : बॉलिवूडमध्ये सामाजिक मुद्दांना लक्षात घेऊन गोष्टी लिहिल्या आणि पडद्यावर उतरवल्या जातात. पण आधीच्या आणि आताच्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये मोठे बदल झाले आहेत. सध्या बॉलिवूडमध्ये फिचर फिल्म बनवण्यावर भर दिला जात आहे. अशाच पठडीतील एक चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. सोनम कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला चाहत्यांकडून तसंच चित्रपट समिक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. 



समलैंगिक नात्यांवर आधारित या चित्रपटात सोनम कपूर एका अशा मुलीची भूमिका साकारली आहे जी लहानपणापासून चित्रपट बघून लग्नाची स्वप्न बघू लागते. ती मोठी झाल्यावर तिचे कुटुंबीय तिचं लहानपणापासूनचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. पण या सगळ्यात सोनम या लग्नासाठी खुश नसते. सोनमचं चित्रपटाचा नायक राजकुमार राववर नाही तर एका मुलीवर प्रेम आहे. आपली मुलगी समलैंगिक आहे हे सत्य जेव्हा तिच्या कुटुंबीयांसमोर येतं, तेव्हा तिच्या घरचे कोणत्याही मुलाशी सोनमचं लग्न लावून देऊ पाहतात... या दरम्यान सोनम, तिचे कुटुंबीय आणि तिचं प्रेम या लढाईला कशी सामोरी जाते, ते या चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे. 


'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' चित्रपटातून दाखवण्यात आलेल्या समलैंगिक नात्याला भावनात्मकरित्या परंतु अतिशय ठोसपणे मांडण्यात आले आहे. चित्रपट पूर्वार्धांत अगदी संथ वाटतो पण चित्रपट उत्तरार्ध मात्र मुद्यावर आणतो आणि अधिक मनोरंजक, संवेदनशीलही होत जातो. सोनमने तिची भूमिका चोख बजावत भूमिकेतील भाबडेपणा शेवटपर्यंत धरून ठेवला आहे. आपल्या समलैंगिक पार्टनरसोबतची सोनमची केमिस्ट्री तितकीशी जवळची वाटत नाही. अनिल कपूर यांनीही चित्रपटात 'रिल' वडिलांची भूमिका अगदी 'रिअल'सारखीच साकारली आहे. जुही चावलाने केलेलं कॉमिक टाईमिंग चित्रपटाला उचलून धरण्यात काही अंशी यशस्वी ठरलं आहे. चित्रपटातील राजकुमार राव याची भूमिका प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहे.  


'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' चित्रपटाचे दिग्दर्शन शैली चोप्रा धर यांनी केलं आहे. दिग्दर्शक म्हणून शैली चोप्रा धरचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटातून अनिल कपूर आणि जुही चावला तब्बल नऊ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकत्र आले आहेत.