`शक्तीमान` फेम अभिनेत्याच्या मोठ्या भावाचं निधन; नुकताच कोरोनावर केली होती मात
सर्वत्र चिंताजनक परिस्थिती....
मुंबई : कोरोना रूग्णांची संख्या ज्या गतीने वाढत आहे. ती बाब अत्यंत चिंताजनक आहे. तर दुसरीकडे मृत्यूचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचा शिरकाव आता बॉलिवूडमध्ये देखील झाला आहे. तर बॉलिवूडमध्ये देखील कोरोनामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. आता धक्कादायक गोष्ट म्हणजे अभिनेता मुकेश खन्नाच्या मोठ्या भावाचं निधन झालं आहे. मुकेश खन्नाच्या मोठ्या भावाचं नाव सतीश खन्ना असं आहे. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना ह्रदय विकाराचा झटका आला. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी मुंबईच्या राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला.
मुकेश खन्ना यांनी एका वृत्तवाहिनीला मोठ्या भावाचं निधन झाल्याची माहिती दिली. 'कोरोना व्हायरसवर मात केल्यानंतर माझे मोठे बंधू सतीश खन्ना यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व उपाय सुरू होते. 8 एप्रिल रोजी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह देखील आली. पण शनिवारी दुपारच्या सुमारास त्यांना अशक्त वाटू लागलं म्हणून त्यांना आम्ही जवळच्या रूग्णालयात दाखल केलं...'
'त्यांना ह्रदय विकाराचा झटका आला. रूग्णालयात दाखल करताचं त्यांना मृत घोषित करण्यात आलं.' असं सांगत मुकेश यांना भावाच्या मृत्यूची बातमी दिली. सतीश खन्ना उद्योजक होते. वयाच्या 84 व्या वर्षी देखील त्यांना क्रिकेट, फुटबॉल आणि टेनिस या खेळांमध्ये रस होता. ते रोज टेनिस खेळायचे. मुकेश खन्ना यांच्या बद्दल सांगायचं झालं तर ते सध्या कोरोना ग्रस्तांची मदत करत आहेत. कोरोना रूग्णांना पैसे, रूग्णालयात बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन सिलेंडरच्या तुटवड्याबाबत सोशल मीडियावर टिप्पणी करत असतात.