मुंबई : मुंबईच्या ऐतिहासिक टाऊन हॉलच्या पायऱ्यांवरची सायंकाळ आणि सोबतीला भारतीय शास्त्रीय संगीताची मैफल. तमाम रसिकप्रेमींसाठी १४ आणि १५ जानेवारी २०२३ रोजी, महाराष्ट्र पर्यटन यांच्या सहकार्याने  ३१ व्या मुंबई संस्कृती संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवातून लाईव्ह म्युजिकच्या माध्यमातून मुंबईचा महान वारसा जगापुढे आणण्याचा प्रयत्न केला जातोय. गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधामुळे   ऐतिहासिक  कॉन्व्होकेशन हॉल, मुंबई विद्यापीठ येथे या महोत्सवाचे वर्च्युअली आयोजन करून आपली परंपरा अखंडित ठेवली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा संस्कृतीचा हा सोहळा अगदी दिमाखात ऐतिहासिक टाऊन हॉल येथे साजरा होत आहे.  महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी राहुल शर्मा (संतूर) सोबत पं. भवानी शंकर (पखवाज) व पं. मुकुंदराज देव(तबला) हे आपल्या स्वर्गीय सुरांच्या साथीने राहुल शर्मा यांचे वडील गुरु पद्मविभूषण स्वर्गीय पंडित शिवकुमार शर्मा यांना मानवंदना देतील. 


गुरु पद्मविभूषण स्वर्गीय पंडित शिवकुमार शर्मा यांच्या गायनाने अनेक कार्यक्रम अविस्मरणीय ठरले होते, अशा महान व्यक्तीला दिली जाणारी स्वरमयी आदरांजली महोत्सवाचे एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सायंकाळी विदुषी शुभा मुदगल (गायन) सोबत प.अनिश प्रधान (तबला) व पं.सुधीर नायक (हर्मोनियम) आपल्या स्वरांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध करतील. या सोहळ्याचे 'बाणगंगा फेस्टीव्हल' हे नाव बदलून 'मुंबई संस्कृती' असं ठेवण्यात आलं आहे.


मुंबई संस्कृती फेस्टिव्हल:


मुंबईतील द इंडियन हेरीटेज सोसायटी (IHS) ही संस्था महाराष्ट्र पर्यटनाच्या सहयोगाने मुंबई संस्कृती या संगीत सोहळ्याचे आयोजन करते. संगीत क्षेत्राचा अमुल्य ठेवा जतन करण्याच्या उद्दिष्टाने दरवर्षी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हा दोन दिवसीय शास्त्रीय संगीताचा सोहळा ऐशियाटीक लायब्ररीच्या ऐतिहासिक टाऊन हॉल येथे साजरा केला जातो.

आपल्याकडे फार कमी गोष्टी पिढ्यांपिढ्या पुढे आल्या आहेत आणि संस्कृती त्यापैकीच एक आहे. आपला वारसा, संस्कृती, परंपरा या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत आणि त्यांचे संवर्धन हे झालेच पाहिजे. या संवर्धनात आपलेही योगदान असावे यासाठी आम्ही हा महोत्सव आयोजित करतो,जेणेकरून कला,स्थापत्य आणि संगीताच्या माध्यमातून आपण मुंबईचा वारसा जपू शकतो आणि साजरा देखील करू शकतो, अशी माहिती इंडियन हेरिटेज सोसायटीच्या मुंबईच्या माजी अध्यक्षा अनिता गरवारे यांनी दिली आहे.