Nagarjuna On Maldives Lakshadweep And PM Modi Comments: पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मालदीवमधील उपमंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांचे पडसाद अजूनही उमटत आहेत. भारताने सरकारी स्तरावर यासंदर्भात आक्षेप नोंदवल्यानंतर या तिन्ही उपमंत्र्यांना पदावरुन हटवण्यात आलं आहे. मात्र त्यानंतरही भारतीयांनी सोशल मीडियावरुन या प्रकरणावरुन मालदीवरील नाराजी व्यक्त करणं सुरु ठेवलं असून भारतीयांसाठी सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेल्या मालदीववर बहिष्कार टाकून आपल्या लक्षद्वीपला फिरायला जाण्याचं आवाहन केलं जात आहे. हे आवाहन करणाऱ्यांमध्ये सेलिब्रिटींचाही समावेश आहे. भारतीय पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरल्याने मनोरंजन सृष्टीतील अनेक मान्यवरांनी उघडपणे मालदीववर बहिष्कार टाकण्यासंदर्भात प्रतिक्रिया नोंदवली आहे. असं असतानाच आता तेलगू चित्रपटसृष्टीमधील दक्षिणेतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेल्या नागार्जुन यांनी आपला मालदीवचा दौरा रद्द केला आहे. इतकेच नाही तर त्यांनी मोदींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांचाही समाचार घेतला आहे.


घाबरुन दौरा रद्द केला नाही तर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागार्जुन यांनी आपण कोणालाही घाबरुन मालदीवचा दौरा रद्द केलेला नाही असं सांगतानाच अशा परिस्थितीमध्ये जाणं योग्य ठरणार नाही असं वाटल्याने तिकीट रद्द केल्याचं सांगितलं. मालदीवच्या उपमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधांनावरही नागार्जून यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रिया उमटणारच असं नागार्जून यांनी म्हटलं आहे. 


...म्हणून तिकीट रद्द केलं


तेलगू चित्रपट निर्माते समितीकडून युट्यूबवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडीओमध्ये नागार्जून त्यांच्या मालदीव दौऱ्याबद्दल बोलताना दिसत आहेत. गीतकार चंद्रबोस आणि एम. ए.म कीरावानी यांच्याबरोबर चर्चा करताना नागार्जून यांनी, "मी 'बिग बॉस' तसेच 'ना सामी रंगा' साठी कोणताही ब्रेक न घेता सलग 75 दिवस काम करत आहे. सध्या मी माझे तिकीट कॅन्सल केले आहेत. मी पुढल्या आठवड्यात लक्षद्वीप जाण्याचा विचार करतोय. मी हा निर्णय कोणाला घाबरुन घेतलेला नाही. मला सध्याचं वातावरण योग्य वाटलं नाही म्हणून मी तिकीट रद्द केलं आहे," असं सांगितलं.


मोदींबद्दलच्या विधानांवरुन संताप


पंतप्रधान मोदींबद्दल मालदीवच्या नेत्यांनी वापरलेल्या अपशब्दांवरही नागार्जून यांनी संताप व्यक्त केली. "त्यांनी जे काही म्हटलं तसेच ते जे काही बोलले ते फार चांगलं नव्हतं. ते आमचे पंतप्रधान असून त्यांच्याबद्दल अशी विधानं करणं योग्य नाही. ते 150 कोटी लोकांचं नेतृत्व करतात. त्यांनी (मालदीवच्या मंत्र्यांनी) ज्या पद्धतीची वर्तवणूक केली ती योग्य नाही. ते याचेच परिणाम भोगत आहेत. प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रिया येत असते," असा खोचक टोला नागार्जून यांनी मालदीवमधील वाचाळवीर नेत्यांना लगावला आहे.


लक्षद्वीपबद्दल भरभरुन बोलले


नागार्जून लक्षद्वीपच्या बंगारम बेटावरील सौंदर्याबद्दलही भरभरुन बोलले. लवकरच आपण तिथे भेट देणार असल्याचं नागार्जून म्हणाले. एम. एम. किरावानी यांनीही आपल्याबरोबर लक्षद्वीपच्या दौऱ्यावर यावं असंही नागार्जून यांनी म्हटलं.


अनेकांनी टाकलाय बहिष्कार


नागूर्जून यांच्या आधी अनेक भारतीय सेलिब्रिटींनी मालदीवचा दौरा रद्द केला आहे. मालदीवऐवजी हे सेलिब्रिटी लक्षद्वीपमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजनेही मालदीवमध्ये शुटींगवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे.