`गॉडफादर`ला डिरेक्ट करण्याचा आनंद नागराजने केला व्यक्त
मराठी सिनेसृष्टीचं २०१६ हे वर्ष गाजवणारा दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. कोणतेही कसलेले कलाकार नसताना `सैराट` या सिनेमाने विक्रम रचले.
मुंबई : मराठी सिनेसृष्टीचं २०१६ हे वर्ष गाजवणारा दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. कोणतेही कसलेले कलाकार नसताना 'सैराट' या सिनेमाने विक्रम रचले.
आणि नागराज मंजुळेचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. आणि सगळ्या भाषेतील दिग्दर्शकांनी सैराटला उचलून धरलं. त्यानंतर साऱ्यांच्या नजरा होत्या त्या नागराजच्या आगामी प्रोजेक्टकडे. नागराज आता पुढे काय करतोय हे जाणून घेण्यात साऱ्यांना उत्सुकता होती. आणि अखेर त्यावरून पडदा उठला. नागराज मंजुळेच्या पुढील सिनेमात चक्क बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन आपल्याला दिसणार आहेत. बिग बींसोबत काम करण्याचं स्वप्न साऱ्या कलाकारांच असतं आणि हे प्रत्येकजण बोलून देखील दाखवतं. पण हिंदीमध्ये पहिला सिनेमा दिग्दर्शित करणाऱ्या या दिग्दर्शकला अभिनेता म्हणून अमिताभ बच्चन लाभले ही सर्वात मोठी गोष्ट.
आणि याच गोष्टीचं कौतुक प्रेक्षकांबरोबरच नागराजला स्वतःला देखील आहे. नागराज मंजुळेने याबाबतची पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. नागराजने या अगोदर अनेकदा आपलं बालपण हिंदी सिनेमांशी कसं निगडीत होतं. आणि बॉलिवूडचा कसा प्रभाव आपल्या जीवनावर पडला हे सांगितलं आहे. पण ज्या अभिनेत्याला सिनेमांत पाहून आपल्यावर दिग्दर्शनाचे संस्कार झाले त्याच व्यक्तीला आपण आपल्या सिनेमात दिग्दर्शित करत असल्याचं कौतुक नागराजला विशेष आहे. आणि त्याने त्याचा हा आनंद फेसबुकवर पोस्ट टाकून शेअर केला आहे.