`या` सिनेमातून पुन्हा एकदा आर्ची-परश्या प्रेक्षकांच्या भेटीला
फक्त मराठीतच नव्हे तर परदेशातही या सिनेमाचं भरभरून कौतुक झालं
मुंबई : संपूर्ण जगाला आपल्या अभिनयाने दखल घ्यायला भाग पाडणारी लोकप्रिय जोडी 'आर्ची-परश्या' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. खूप दिवसांपूर्वी रिंकू आणि आकाश 'सैराट 2'मधून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणारी अशी बातमी समोर आली होती. आता त्याचा खुलासा झाला आहे ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आणि ते ही नागराज मंजुळेच्याच सिनेमातून. पण तो सिनेमा 'सैराट' नसून 'झुंड' असा आहे.
नागराज बिग बींसोबत नागपूरमध्ये 'झुंड'चं शुटिंग करत होता. यावेळी रिंकू आणि आकाश ही जोडी देखील तेथे उपस्थित होती. या दोघांनी देखील नागराजच्या या बॉलिवूड डेब्यू सिनेमात काम केलं आहे. आपल्याला माहितच आहे नुकतंच या सिनेमाचं शुटिंग संपलं आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी कायमच या सिनेमाच्या शुटिंगचे अपडेट आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेच आहेत. 'झुंड' सिनेमाच्या चित्रिकरणाचा अनुभव त्यांच्यासाठी अतिशय खास असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
2016 या साली संपूर्ण सिनेसृष्टीला 'सैराट'ने दखल घ्यायला भाग पाडली. फक्त मराठीतच नव्हे तर परदेशातही या सिनेमाचं भरभरून कौतुक झालं. सिनेमाचं कोणतंही ज्ञान नसताना, कुणाकडूनही प्रशिक्षण घेतलेलं नसताना या सिनेमातील आर्ची -परश्या या जोडीने तमाम जनतेला वेड लावलं. आणि आता हीच जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे त्यांचे चाहते अतिशय खुश आहेत. तसेच आर्ची परश्याला देखील एवढ्या मोठ्या महानायकासोबत स्क्रिन शेअर करता येणार आहे.
'सैराट'नंतर परश्या म्हणजे आकाश ठोसरने 'फयू' या सिनेमात काम केलं. पण हा सिनेमा फार चालला नाही. तर रिंकूने 'सैराट'चा रिमेकमध्ये काम केलं पण तो सिनेमा अजून प्रदर्शित झाला नाही. तसेच 'कागर' या सिनेमात देखील तिने काम केलं पण हा सिनेमा देखील अजून प्रदर्शित झाला नाही. 14 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. पण रिंकूच्या बारावीच्या परिक्षेमुळे त्याची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. तोपर्यंत रिंकूच्या तिसऱ्या आणि तेही बॉलिवूड सिनेमाची माहिती समोर आली आहे.