ओल्या कपड्यांमध्ये Nana Patekar दिलीप कुमार यांच्या घरी पोहोचले, दरवाजा उघडला अन् मग...
नाना पाटेकर म्हणाले की, आजही जेव्हा त्यांना एखादी भूमिका कठीण वाटली की ते जुन्या कलाकारांचे चित्रपट पाहतात.
नाना पाटेकर हे हिंदी चित्रपटसृष्टीमधील नावाजलेले नाव. 46 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये त्यांनी अनेक दमदार आणि स्मरणात राहणाऱ्या भूमिका साकारल्यात. हिंदीसोबत त्यांनी मराठी चित्रपटातही अभिनय केला. सध्या त्यांची एक मुलाखतची खूप चर्चा होतेय. त्यांनी या मुलाखतीत वैयक्तिक आयुष्यासोबत हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक किस्से सांगितले. 'द ललनटॉप'च्या 'गेस्ट इन द न्यूजरूम' या विशेष कार्यक्रमाच्या 100 व्या भागात नाना पाटेकर यांना पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. ते म्हणाले की, आजही जेव्हा त्यांना एखादी भूमिका कठीण वाटली की ते जुन्या कलाकारांचे चित्रपट पाहतात.
नाना पाटेकर यांना 1994 मध्ये आलेल्या 'क्रांतीवीर' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार त्यांना दिग्गज दिलीप कुमार यांच्या हस्ते देण्यात आला होता. नाना सांगतात की तो क्षण त्यांच्यासाठी खूप भावनिक होता. पुरस्कार मिळाल्यानंतर दिलीप कुमार यांनी नानांना त्यांच्या घरी बोलावले होते, असं त्यांनी सांगितलं.
काय आहे तो किस्सा?
जेव्हा नाना पाटेकर दिलीप कुमार यांच्या घरी गेले होते, तेव्हाचा किस्सा त्यांनी सांगितला. ते म्हणाले की, 'दिलीप साहेबांनी मला त्यांच्या घरी बोलावले होतं. पाऊस पडत होता आणि त्यांच्या घरी जाईपर्यंत मी पूर्ण भिजलो होतो. जेव्हा दिलीप कुमार यांनी पहिल्यांदा त्यांनी मला असं पाहिलं त्यानंतर घरात जाऊन त्यांनी सगळ्यात पहिले टॉवेल आणला. मला बसवलं आणि हाताने डोके पुसायला सुरुवात केली. मग ते आत गेले आणि एक कुर्ता आणला आणि मला ओला कुर्ता बदलण्यास सांगितला. आयुष्यात यापेक्षा मोठा पुरस्कार कोणता असू शकतो?' य़ा शब्दात त्यांनी या भेटीच वर्णन केलं.
नाना पाटेकर पुढे म्हणालेत की, सत्यजित रायसाहेबांच्या डायरीत दिलीप कुमार यांचं एक पान प्रकाशित झालं होतं. 'ज्यामध्ये मला नाना पाटेकर यांच्यासोबत काम करायचं आहे, असं लिहिलं होतं.' आता यानंतर तुम्हाला आणखी कोणता अकादमी पुरस्कार हवा आहे? त्यांच्यासोबत काम करण्याची आमची क्षमता नाही पण त्यांना ते जाणवलं. आयुष्यात अजून काय हवे आहे मित्रा? आम्ही खूप भाग्यवान आहोत.' हा प्रसंग सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरील तो आनंद टिपण्यासारखा होता. या मुलाखतीत त्यांनी तपन सिन्हा, सत्यजित रे, संजय लीला भन्साळी, विधू विनोद चोप्रा आणि त्यांच्या 'शक्ती', 'तिरंगा', 'क्रांतीवीर' या चित्रपटांबद्दलही खूप किस्से सांगितलंय.