`आम्हाला मारायचं का?` आता जया बच्चन नातीवर संतापल्या
यावेळी नव्याने तिने बनवलेल्या पदार्थाची चव चाखल्यानंतर आजी आणि भावाची प्रतिक्रिया काय होती याबद्दलही भाष्य केले.
Navya Naveli Nanda Podcast : बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांचे कुटुंब कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिच्या पॉडकास्टचा एक भाग नुकताच प्रदर्शित झाला. यात जया बच्चन आणि श्वेता नंदा यांनी बच्चन कुटुंबीय खाण्याचे किती चाहते आहेत आणि त्यांना कोणत्या प्रकारचे जेवण आवडते याबद्दलचा खुलासा केला. यावेळी नव्याने तिने बनवलेल्या पदार्थाची चव चाखल्यानंतर आजी आणि भावाची प्रतिक्रिया काय होती याबद्दलही भाष्य केले.
आजी आणि भाऊ खाताना रडले
नव्या नवेली नंदा तिच्या ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्टमध्ये कायमच गमतीशीर किस्से शेअर करताना दिसते. यावेळी नव्याने आजी जया बच्चन यांना एका घडलेल्या किस्स्याची आठवण करुन दिली. यावेळी नव्या म्हणाली, "एकदा मी तुमच्या दोघांसाठी (जया बच्चन आणि अगस्त्य नंदा) यांच्यासाठी पास्ता बनवण्याचा विचार केला होता. त्याला त्या दोघांनीही होकार दिला. मी किचनमध्ये गेले आणि त्यानंतर पास्ता बनवताना त्यात लसूण, मिरची हे पदार्थ टाकले. त्यासोबतच मी त्यात तिखट मसालाही घातला. पण हा पास्ता इतका तिखट झाला की तो खाताना ते अक्षरश: रडू लागले होते."
जया बच्चन यांचा संताप
"यानंतर मला आजी (जया बच्चन)ने तुला आम्हाला मारायचं आहे का? असा प्रश्न विचारला होता. तू बनवलेला पास्ता खूपच तिखट आहे. यानंतर जया बच्चन, श्वेता नंदा आणि नव्या हसायला लागल्या. त्यानंतर श्वेताने बच्चन कुटुंबात असा कोणता पदार्थ आहे, जो आठवड्यातून एकदा बनतोच याबद्दल भाष्य केले आहे. बच्चन कुटुंबात सुरुवातीपासूनच विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. पण आठवड्यातून एकदा तरी राजमा भात बनवला जातो. विशेष म्हणजे घरातील एखादा व्यक्ती जर एखादा पदार्थ फारच उत्कृष्ट बनवत असेल, तर त्या पदार्थाला त्या व्यक्तीचे नाव दिले जाते", असाही खुलासा जया बच्चन यांनी केला.
बच्चन कुटुंबाच्या घरी पदार्थांना खास नावं
"याचाच अर्थ बच्चन कुटुंबातील काही पदार्थांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. जसे की अभिषेक बच्चन हा मटणाचा रस्सा खूपच चांगला बनवतो, त्यामुळे अभिषेकची मटण करी असे नाव आम्ही दिली आहे. तर श्वेता नंदा पास्ता बनवते, त्यामुळे श्वेताचा पास्ता असे नाव त्याला देण्यात आले आहे. त्यासोबतच आमच्याकडे 'नानी माँ की खिचडी' हे देखील फारच प्रसिद्ध आहे, जे ती बंगाली शैलीत बनवते. त्यासोबतच आमच्याकडे 'मामा टोस्ट' आहे. ज्याचा शोध आजीने लावला आहे. आमच्याकडे 'नव्याचा बटाटा' आहे, कारण मी ती रेसिपी तयार केली आहे. आमच्याकडे 'श्वेताचा पास्ता'देखील आहे. 'मी श्वेताचा पास्ता खाईन.' असे आजोबा अनेकदा सांगतात. तसेच प्रत्येक घराची एक खासियत असते. त्याचप्रकारे आमच्या घरी बटाट्याची साल खायला लोकांना खूप आवडते", असेही यावेळी जया बच्चन यांनी म्हटले.