अर्चना पूरन सिंहशी तुलना केल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, `तीन तास मेकअप...`
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी `हड्डी` सिनेमातील फिमेल लूकमुळे गेल्या काही दिवसात चर्चेत आहे.
Nawazuddin Siddiqui Reaction On Female Look: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी 'हड्डी' सिनेमातील फिमेल लूकमुळे गेल्या काही दिवसात चर्चेत आहे. या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. अक्षत अजय शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी एका महिलेची आणि ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे. या लूकसाठी अभिनेत्याचा तासंतास मेकअप करावा लागायचा. महिलांना तयार होण्यासाठी इतका वेळ का लागतो? याबाबतही नवाजुद्दीन सिद्दीकी याने सांगितलं आहे. तसेच या लूकमुळे आपल्या मुलीच्या नाराजीलाही सामोरे जावे लागल्याचं नवाजुद्दीन याने सांगितलं. दुसरीकडे, अनेक सोशल मीडिया युजर्सनी नवाजुद्दीनच्या फिमेल लूकची तुलना अर्चना पूरन सिंहसोबत केली आहे.
अर्चना पूरन सिंहसोबत तुलना केल्याने नवाजुद्दीन म्हणाला की, "या लूकसाठी कोणाकडूनही प्रेरणा घेतली नाही. जर मी स्त्री पात्र साकारत असेल तर मला स्त्रीसारखा विचार करावा लागेल आणि एक अभिनेता म्हणून ही माझी परीक्षा आहे. आउटफिट, केस, मेकअप, हे सगळं ठीक आहे. मला याची चिंता नाही."
"लूक पाहण्यासाठी तज्ज्ञ आहेत आणि त्यांना त्यांचे काम माहित आहे. माझे काम हे पात्र साकारण्याचं आहे. महिलांना काय आणि कसे वाटते? त्यांना काय हवे आहे? एखाद्या अभिनेत्याचे काम म्हणजे त्याच्या व्यक्तिरेखेत प्रवेश करणे. स्त्रीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन खूप वेगळा आहे. चित्रपट केवळ वेशभूषा आणि हावभावांवर आधारित नाही. एखादी भूमिका साकारणं एक खोल प्रक्रिया आहे.", असंही नवाजुद्दीनं सिद्दीकीनं पुढे सांगितलं.
'माझी मुलगी जेव्हा मला महिलेच्या ड्रेसमध्ये पाहायची तेव्हा तिला राग यायचा. तिला आता माहित आहे की, मी चित्रपटातील पात्रासाठी करत आहे आणि आता ठीक आहे.', असं नवाजुद्दीन सिद्दीकी याने पुढे सांगितलं.