Nitesh Pandey Death News: 'अनुपमा' या लोकप्रिय मालिकेमध्ये रुपाली गांगुलीची मैत्रीण देविका हिच्या पतीचं पात्र साकारणारे अभिनेते नितेश पांडे (Nitesh Pandey) यांचं निधन झालं आहे. 23 मे रोजी कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे (Cardiac Arrest) नितेश यांचा मृत्यू झाला. नितेश हे 51 वर्षांचे होते. 'साराभाई व्हेर्सेस साराभाई' मालिकेतील अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा मृत्यू झाल्यानंतर नितेश यांच्या मृत्यूने मालिका श्रेत्राला आणखीन एक धक्का बसला आहे. 


हॉटेलमध्ये असतानाच कार्डिअ‍ॅक अरेस्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'प्यार का दर्ज है मिठा मिठा प्यारा प्यारा' या मालिकेमधून नितेश यांनी साकारलेल्या 'हरिश कुमार'चं पात्र प्रचंड लोकप्रिय झालं. त्यानंतर 'अनुपमा'मधील आपल्या भूमिकेमुळे नितेश घराघारत पोहोचले होते. नितेश यांच्या मृत्यूच्या वृत्ताला त्यांचे मेहुणे आणि निर्माते सिद्धार्थ नागर यांनी दुजोरा दिला आहे. नितेश यांच्या मृत्यूने त्यांची पत्नी अर्पिताला मोठा मानसिक धक्का बसला आहे. नितेश इगतपुरीमध्ये शुटींगसाठी गेले होते. त्याचवेळी त्यांना रात्री हॉटेलमध्ये दीडच्या सुमारास कार्डिअ‍ॅक अरेस्टचा त्रास झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. नितेश यांचे वडील इगतपुरीला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. आज सायंकाळपर्यंत नितेश यांचं पार्थिव मुंबईत आणलं जाणार आहे. सिद्धार्थ नागरही इगतपुरीला रवाना झाले आहेत. 



शाहरुख बरोबर केलेलं काम


नितेश यांचा जन्म 17 जानेवारी 1973 रोजी झाला होता. त्यांनी अनेक मालिकांबरोबरच चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्यांनी मालिकांमुळे प्रचंड लोकप्रियता मिळवली. 'ओम शांति ओम' चित्रपटामध्ये त्यांनी शाहरुख खानच्या सहाय्यकाची भूमिका साकारली होती. तसेच दिशा परमार आणि नकुल मेहता यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा'मधील नितेश यांची भूमिकाही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली.


लग्नामुळेही चर्चेत


नितेश पांडेंचं खासगी आयुष्यही फारच चर्चेत राहिलं. त्यांनी अश्विनी कालेसकर यांच्याबरोबर 1998 साली लग्न केलं. त्यानंतर त्यांचा 2002 साली घटस्फोट झाला. नंतर नितेश यांनी अर्पिता यांच्याशी लग्न केलं. अर्पिताही अभिनेत्री आहेत.


मालिका आणि चित्रपट


नितेश पांडे यांनी 1995 मध्ये टीव्ही क्षेत्रातील आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यांनी 'तेजस', 'साया', 'मंजिलें अपनी अपनी', 'जुस्तजू', 'हम लड़कियां', 'सुनैना', 'कुछ तो लोग कहेंगे', 'एक रिश्ता साझेदारी का', 'महाराजा की जय हो', 'हीरो-गायब मोड ऑन' इतक्या मालिकांमध्ये काम केलं. त्यांची 'अनुपमा'मधील धीरज ही भूमिका विशेष गाजली. तसे त्यांनी 'ओम शांति ओम'बरोबरच 'बधाई दो', 'मदारी', 'दबंग 2' चित्रपटांमध्येही काम केलं.