नवी दिल्ली : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री लक्ष्मीप्रिया बेहरा उर्फ निकिता हिचा गेल्या शुक्रवारी घराच्या गच्चीवरून पडल्यानंतर मृत्यू झाला होता. यानंतर पोलिसांनी लक्ष्मीप्रिया हिचा पती लिपन साहू याला अटक केलीय. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. पोस्टमॉर्टेमध्ये लक्ष्मीप्रिया हिचा मृत्यू उंचावरून पडल्यानंतर आंतरिक आणि बाह्य जखमांमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. कटक शहराचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) अखिलेश्वर सिंह यांनी गुरुवारी पोस्टमॉर्टेम रिपोर्ट मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. लक्ष्मीप्रिया हिचा मृत्यू केवळ एक अपघात होता की तिला धक्का देऊन खाली पाडण्यात आलं, याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२८ वर्षीय अभिनेत्री लक्ष्मीप्रिया ही महानदी विहारमध्ये आपल्या आई-वडिलांच्या घरी असताना ही घटना घडली होती. मृत्यूपूर्वी लक्ष्मीप्रिया हिचं तिच्या पतीशी जोरदार भांडण झालं होतं. त्यानंतर ती गच्चीवरून कोसळली. लक्ष्मीप्रिया हिचा मृत्यू संशयास्पद असल्यानं पोलिसांनी तिचा पती लिपन साहू याला मंगळवारी अटक केली. तसंच लिपन याच्या आई-वडिलांवरही घरगुती हिंसाचाराचे आरोप आहेत. त्यांनाही पोलीस स्टेशनमध्ये हजर होण्याची नोटीस देण्यात आली.


लक्ष्मीप्रिया बेहरा

घटनेनंतर लिपन साहू याचे आई-वडिल आपल्या राहत्या घरातून अचानक गायब झालेत. त्यांच्याबद्दल कुटुंबीयांनाही कोणती माहिती नाही. नोव्हेंबर २०१६ मध्ये विवाहानंतर निकिता हिनं आपलं सोसर सोडलं होतं. ऑगस्ट २०१७ पासून भुवनेश्वरमध्ये ती आपल्या पतीसोबत राहत होती. या जोडप्याला एक सहा महिन्यांची मुलगीही आहे.


लक्ष्मीप्रिया हिनं 'चोरी चोरी मन चोरी', 'मा रा पनाटकनी', 'स्माईल प्लीज' या ओडिया सिनेमांत काम केलं होतं.