मुंबई : अनेकांचं नशीब पालटण्यास सोशल मीडियावरील एक पोस्टही पुरेशी असते असं म्हणतात. हे वाक्य पटवून देणाऱ्या अनेक घटनाही घडल्या आहेत. ही उदाहरणं आता नव्यानं देण्याची गरज नाही. पण, या उदाहरणांच्या यादीत एक नाव जोडलं जाण्याची नक्कीच गरज आहे. कारण, एका चिमुकल्यानं केलेली कमालच अशी आहे, की भल्याभल्यांनी त्याला दाद दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेमध्ये येऊन गाणी गाणारे अनेक कलाकार आपण पाहिले असतील. त्यातील अनेकांचे आवाज, त्यांच्यावर असणारा कलेचा वरदहस्त खरंच थक्क करणारा असतो. असाच एक लहान मुलगा सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे. बसपन का प्यार म्हणणारा सहदेव ज्याप्रमाणं रातोरात स्टार झाला, तसंच या मुलालाही स्टार करण्यासाठी आता नेटकऱ्यांनी त्याचा व्हिडीओ व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. 


रॅपर बादशाह यानं गायलेल्या अभी तो पार्टी शुरु हुई है, या गाण्याला या लहानगा ढोलकच्या तालावर सादर करत आहे. ढोलकवर थाप मारत तो गाण्याला असा काही ठेका देत आहे, हे पाहून भाई वाह...! अशीच प्रतिक्रिया अनेकजण देत आहेत. गाणं सादर करताना त्या मुलाच्या चेहऱ्यावर असणारा आत्मविश्वासही खूप काही बोलून जात आहे. 



यालाही प्रसिद्ध होण्याचा हक्क आहे, अरे हा व्हिडीओ व्हायरल करा असं म्हणत अनेक नेटकऱ्यांनी आता तो शेअरही केला आहे. शेवटी मुद्दा हाच की बाहशाहपर्यंत हा व्हिडीओ पोहोचणार का, आणि पोहोचलाच तरी या चिमुरड्याचं नशीब कोणत्या वळणावर जाणार?