माझी होशील ना? विचारणाऱ्या अभिनेत्याला प्रेयसीचं लाखात एक उत्तर
लोकप्रिय मराठी अभिनेत्री होणार सासू...
पुणे : गेल्या बऱ्याच दिवासांपासून लग्नसराईचे वारे वाहत आहेत. बऱ्याचजणांनी आपल्या आयुष्यभराच्या जोडीदाराची निवड करत एका नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. कलाकार मंडळीही यात मागे राहिलेले नाहीत. अशातच आता आणखी एका राजबिंड्या अभिनेत्याची भर पडली आहे.
अभिनय क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या कुटुंबातील हा नव्या जोमाचा अभिनेता आता आनंदाच्या शिखरावर असेल यात शंका नाही.
कारण, मौका भी है, और दस्तूर भी असं म्हणत त्यानं आपल्या प्रेयसीला लग्नाची मागणी घातली असल्याचं कळत आहे.
'माझा होशील ना?' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेता विराजस कुलकर्णी यानं त्याच्या प्रेयसीला अखेर, 'माझी होशील ना?' हा प्रश्न विचारला आहे. (Virajas Kulkarni)
बरं, त्याच्या या प्रश्नाला प्रेयसीनंही लाखात एक उत्तर दिलं आहे. अर्थात तिनं त्याला होकार दिला आहे.
अतिशय सुरेख अंदाजात आपलं नातं स्वीकारत विराजसच्याही प्रेमाचा स्वीकार करणारी ही अभिनेत्री, त्याची प्रेयसी आहे शिवानी रांगोळे.
#Virani असा हॅशटॅग जोडत या दोघांनीही सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे.
ज्यामध्ये शिवानी तिच्या हातातील अंगठी आनंदानं सर्वांना दाखवताना दिसत आहे.
मागील तीन वर्षांपासून ही जोडी रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं गेलं होतं. ज्यानंतर आता त्यांची ही पोस्ट, म्हणजे दुग्धशर्कराच.
दरम्यान, अंगठीची ही पोस्ट म्हणजे सारपुडा नव्हे. माध्यमांशी संवाद साधताना विराजसनंच ही बाब स्पष्ट केली.
'मी तिला फक्त तो (लग्नाचा)प्रश्न विचारला आणि तिनं होकार दिला. आमता अधिकृस साखरपुडा झालेला नाही. साखरपुड्याचा साग्रसंगीत सोहळा होईलच.
आम्ही पुढे काय वाढून ठेवलंय याबाबत काहीच ठरवलं नाहीये', असं विराजस म्हणाला.
असो... पण इथं महत्त्वाचं असं, की विराजस आणि त्याची ही प्रेयसी शिवानी आता आयुष्यभरासाठी एकमेकांचे होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
त्यानिमित्तानं अभिनेत्री मृणाल कुलकर्णीही आपल्या सुनेच्या स्वागतासाठी येत्या काही दिवसांत तयारीला लागतील, असं म्हणायला हरकत नाही.