मुंबई : सध्या सगळीकडेच अभिनेते किरण माने यांच्या नावाची चर्चा होत आहे. 'मुलगी झाली हो' या मालिकेतून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याने वातावरण खूपच तापलं आहे. अभिनेता किरण माने यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळे मालिकेतून तडकाफडकी काढल्याचं बोललं जात होतं. ते या मालिकेत विलास पाटीलची भूमिका साकारत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर किरण माने यांच्या विरोधात आता निर्मात्यांनी काही आरोप केले आहेत. स्टार प्रवाह या वाहिनीने एक निवेदन जारी करत आपली बाजू मांडली आहे, यामध्ये त्यांनी किरण माने यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आणि काल्पनिक असल्याचं म्हटलं आहे आणि त्यांना मालिकेतून बाहेर काढण्याची कारणे सांगितली आहेत.


किरण माने यांना शोमधून काढून टाकण्याचा निर्णय शोमधील अनेक सह-कलाकारांसोबत, विशेषतः शोच्या महिला नायिकांशी केलेल्या गैरवर्तनामुळे होता. या मालिकेतील सहकलाकार, दिग्दर्शक आणि शोच्या इतर युनिट सदस्यांनी त्यांच्या सततच्या अनादरपूर्ण आणि आक्षेपार्ह वागणुकीविरुद्ध अनेक तक्रारी केल्या होत्या. असं चॅनेलचं म्हणणं आहे.


किरण माने यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आणि त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. फेसबुक पोस्ट लिहिल्याने आपल्याला मालिकेतून काढलं , असा किरण माने यांचा आरोप आहे. याबाबत अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. 


या प्रकरणात आता मनसे देखील मैदानात उतरली आहे. मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मला या प्रकरणावर काही बोलायचं नाही असं एका मुलाखतीत सांगितलं आहे, किरण माने यांनीच मालिकेतील इतर कलाकारांना त्रास दिला. योग्य वेळी याबाबत आम्ही भुमिका घेऊ, असं त्यांनी सांगितलं.


राजकीय भूमिका घेतल्याने मला कुठलीही पूर्वकल्पना न देता मालिकेतून बाहेर काढला असं असं किरण माने यांचं म्हणणं होतं. यावर अमेय खोपकर म्हणाले, 'कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. राजकीय भूमिकेमुळे नव्हे तर त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या सगळ्यावर योग्य वेळी मनसे आपली भुमिका मांडेल, असं खोपकर म्हणाले.