पुणे : यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव हा खऱ्या अर्थानं वेगळा असणार, असं म्हणता म्हणता गणेशोत्सवाचा दिवस उजाडलाही. अतिशय खास अशा या दिवशी यंदा बाप्पा खऱ्या अर्थानं आठवणींच्या मखरात विराजमान झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही. या आठवणी आहेत मागील काही वर्षांमध्ये आपण नेमका गणेशोत्सव कसा साजरा केला होता, याबाबतच्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरसच्या वैश्विक महामारीचं संकट असल्यामुळं बरीच सावधगिरी बाळगत यंदा बाप्पांचं घरोघरी आगमन झालं आहे. याच पार्श्वभूमीवर लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यानं सोशल मीडियावर त्याच्या मुलीचा म्हणजेच रेणुका हिच्या पहिल्यावहिल्या जाहिरातीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. अतिशय सुरेख संदेश देणाऱ्या या व्हिडिओतून चिमुकली रेणुका अतिशय निरागपणे बाप्पाची काळजी घेताना दिसत आहे. 


'बाप्पाला कोरोना झाला तर....', असं म्हणताना दिसणारी रेणुका फक्त बाप्पाचीच काळजी करत नाही, तर विसर्जन मिरवणुकीसाठी घराबाहेर पडण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्या अनेकांनाच विचार करायला भाग पाडत आहे. रेणुकाचे अनेक व्हिडिओ राहुल सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. त्यामुळं तिचा असा वेगळा चाहता वर्गही निर्माण झाला आहे. पण, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरील जाहिरातीतील तिचं हे योगदान सर्वांचीच दाद मिळवून जात आहे. 


सचिन खेडेकर, श्रुती मराठे, शिवराज वायचळ आणि इतर सहकलाकारांचाही यामध्ये सहभाग असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय अभिनेता सुबोध भावे याच्या आवाजात एक समर्पक संदेश या जाहिरातीतून सर्वांपर्यंत पोहोचत आहे. 'बाहेर नेलं तर बाप्पाला कोरोना होणार नाही. पण, विसर्गजनाच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र बाहेर आलो तर मात्र आपल्याला कोरोना होण्याचा धोका आहे. तेव्हा या वर्षी बाप्पाचं विसर्जन घरीच करुया. शतकांची परंपरा असणारी वारी... ती जर साध्या पद्धतीनं होऊ शकते तर, गणेशोत्सवही साध्या पद्धतीनं साजरा करता येईलच की. सुजाण व्हा, गर्दी टाळा; यावर्षी बाप्पाचं विसर्जन घरीच करा', असा हा संदेश या जाहिरातीतून मिळत आहे. 


Renuka chi pahili ad !! Thank you @punitbalan Ashwini Teranikar Vinod Satav and the fab Director @varunnarvekar

Posted by Rahul Deshpande on Friday, August 21, 2020

पुण्याचे सह पोलीस आयुक्त श्री. रवींद्र शिसवे आणि मुरलीधर मोहोळ यांच्या सहकार्याने पुनीत बालन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या व्हिडिओला सर्व स्तरांतून दाद मिळत आहे.