First Indian To Win An Oscar : सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा 96 वा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक आहेत. कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्करला ओळखले जाते. चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते. 'अँड द ऑस्कर गोज टू…' हे शब्द ऐकण्यासाठी सर्वांचे कान आसुसले असतात. पण यंदाच्या ऑस्कर पुरस्काराच्या निमित्ताने भारताला सर्वात आधी हा सन्मान किती साली मिळाला? आणि तो कोणी मिळवून दिला? यावर आपण नजर टाकणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा 96 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिसमध्ये पार पडणार आहे. या सोहळ्याची अमेरिकेत जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय प्रेक्षकांना या कार्यक्रमाचं लाइव्ह टेलिकास्ट 11 मार्चला पहाटे 4 वाजता डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे. भारताला सर्वात आधी ऑस्कर पुरस्कार हा भानु अथैया यांनी मिळवून दिला. प्रसिद्ध वेशभूषाकार भानु अथैया या ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या पहिल्या भारतीय कलाकार आहेत. 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गांधी’ या चित्रपटासाठी त्यांना ऑस्कर मिळाला होता. हा चित्रपट महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित होता.


1983 मध्ये ऑस्कर पुरस्काराने सन्मानित


या चित्रपटात प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता बेन किंग्सले यांनी महात्मा गांधींची व्यक्तिरेखा साकारली होती. तसेच यात ओम पूरी, रोहिणी हट्टंगडी, सईद जाफरी यांसारख्या अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. पण हा चित्रपट बेन किंग्सले यांचा जबरदस्त अभिनय आणि भानु अथैया यांनी केलेल्या वेशभूषांमुळे विशेष गाजला. या चित्रपटातील सर्व कलाकारांच्या कपड्यांचे डिझाइन्स या भानू अथैया यांनी केले होते. यात अगदी गांधींनी नेसलेल्या सुती धोतरापासून कस्तुरबा गांधी यांच्या साडीपर्यंत सर्व वेशभूषा या वेशभूषाकार भानू अथैया यांच्या मार्गदर्शनाखालीच तयार करण्यात आल्या होत्या. या कामगिरीसाठी त्यांना 1983 मध्ये ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.


त्यानंतर 2001 साली आमिर खानच्या ‘लगान’ या चित्रपटासाठी त्यांना पुन्हा एकदा ऑस्करचे नामांकन मिळाले होते. मात्र त्यांचा हा पुरस्कार थोडक्यात हुकला. त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दीत 100 हून अधिक चित्रपटांसाठी वेषभूषाकार म्हणून काम केले आहे. यासाठी त्यांना दोन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे.


मृत्यूपूर्वी ऑस्कर ट्रॉफी केली अकादमीला परत


भानू अथैया यांचे 15 ऑक्टोबर 2020 साली निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी आपली ऑस्कर ट्रॉफी स्वत: जवळ न ठेवता अ‍ॅकॅडमी संस्थेला परत दिली होती. भानू अथैया यांना त्यांच्या ट्रॉफीची खूप काळजी वाटतं होती. ती ट्रॉफी चोरीला जाईल किंवा त्यांच्या मृत्यूनंतर तिची योग्य काळजी घेतली जाणार नाही, ही चिंता त्यांना सतावत होती. त्यामुळे 2012 मध्ये त्यांनी अॅकॅडमी संस्थेला ती ट्रॉफी परत केली. या संस्थेने देखील हे सन्मानचिन्ह त्यांच्या संग्रहालयात ठेवलं आहे.