`ऑस्कर`नं रद्द केले चार महत्त्वाचे पुरस्कार, चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर
कलाविश्वात ऑस्कर पुरस्काराला अनन्य साधारण महत्त्व आहे. जसजशी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची रात्र जवळ येतेय तसतशी सिने-जगतातील सिताऱ्यांची आणि चाहत्यांची उत्सुकता ताणली जातेय.
मुंबई : कलाविश्वात ऑस्कर पुरस्काराला अनन्य साधारण महत्त्व आहे. जसजशी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची रात्र जवळ येतेय तसतशी सिने-जगतातील सिताऱ्यांची आणि चाहत्यांची उत्सुकता ताणली जातेय. पण पुरस्कार सोहळ्यातील अनेक नकारात्मक बाजू समोर येत असल्यामुळे कलाकारांमध्ये आणि चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरणही दिसून येतंय. मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षीही पुरस्कार सोहळ्यात कोणीही सूत्रसंचालकाची भूमिका साकारणार नाही.
ऑस्कर २०१९ अनेक नकारात्मक कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 'द ऍकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स ऍन्ड सायन्स'ने चार महत्त्वाचे पुरस्कार यंदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे अशा कार्यक्रमांना वेळेचंही बंधन घालण्यात आलंय. कार्यक्रमाची वेळ तीन तासांपुरीता मर्यादित ठेवण्यात येणार आहे. ऑस्करमधून वगळण्यात आलेल्या चार विभागांमध्ये सिनेमॅटोग्राफी, फिल्म एडिटींग, लाइव्ह ऍक्शन शॉर्ट, मेकअप त्याचप्रमाणे हेअर स्टाईलचा समावेश आहे.
'ऍकॅडमी पुरस्कार प्रदर्शित करण्याचे स्वरूप मल्टीमीडियामध्ये झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे कार्यक्रमातदेखील बदल हवे जेणेकरून ते जगभरातील प्रेक्षकांसाठी मोशन पिक्चर्स तयार करू शकेल', असं कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी म्हटलंय.
ऑस्कर २०१९ पुरस्कार सोहळा २४ फेब्रुवारी रोजी (भारतीय वेळेनुसार २५ फेब्रुवारी रोजी) लॉज ऍन्जेलिसमध्ये संपन्न होणार आहे. चार विभागांना वगळ्यात आल्यामुळे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करत आहेत.