धक्कादायक : `पाहिले न मी तुला` मधील अभिनेत्रीचा अपघात, प्रकृती गंभीर
अलिकडेच निरोप घेतलेल्या `पाहिले न मी तुला` या मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं.
मुंबई : अलिकडेच निरोप घेतलेल्या 'पाहिले न मी तुला' या मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना तोंडपाठ आहे. अभिनेता शशांक केतकर यात खलनायिकी भूमिकेत दिसला होता. तर या मालिकेत अनिकेतच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी देखील आपलं पात्र अगदी रंजक केलं होतं.
पण आता या अभिनेत्रीबद्दल धक्कादायक बाब समोर आली आहे. नुकताच वर्षा दांदळे यांनी सोशल मिडीयावर एक मन हेलावून टाकणारी बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
वर्षा दांदळे यांनी आपल्या अपघाताची बातमी नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यात या अपघाताने त्यांची प्रकृती अधिकच खालावली असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
या अपघातात त्यांच्या पाठीला जबरदस्त दुखापत झाली आहे. त्यामुळे मणक्याचा त्रास त्यांना वाटू लागला आहे. एका पायाला देखील गंभीर दुखापत झाली आहे.
या दुखापतीमुळे त्या अंथरुणालाच खिळून आहेत. अपघातामुळे त्यांची परिस्थिती देखील खूपच नाजूक झाली असल्याचे कळतंय. सध्या कुठलीच हालचाल होत नसल्याने त्या आता झोपूनच आराम करत आहेत. वर्षाताईंची प्रकृती लवकर सुधरावी यासाठी सगळेच चाहते मनापासून प्रार्थना करत आहेत.
नांदा सौख्या भरे या मालिकेत वर्षा दांदळे यांनी वच्छी आत्याची भूमिका साकारली होती.