मुंबई : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा भागातील स्थानिक प्रशासनाच्या एका निर्णयाने सध्या सर्वांचच लक्ष वेधलं आहे. फाळणीपूर्व काळात उभारण्यात आलेल्या २५ इमारती खरेदी करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात आला असून, यात दिवंगत अभिनेते आणि हिंदी कलाविश्वाचे 'शो मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज कपूर आणि 'कोहिनूर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्याही घरांचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐतिहासिक वारसा प्राप्त असणाऱ्या आणि फाळणीपूर्व काळात उभारण्यात आलेल्या या २५ इमारती, घरं खरेदी घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून ६१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं कळत आहे. जवळपास ७७ इमारतींना ऐतिहासिक वारसा प्राप्त असून, त्यातील ५२ इमारती या सरकारच्या मालकीच्या असून, उर्वरित २५ इमारतींवर खासगी मालकी आहे. 


कपूर आणि कुमार यांची ही वडिलोपार्जित घरं राष्ट्रीय वारसा म्हणून यापूर्वीच घोषित करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 'किस्सा ख्वानी बाजार' या भागात राज कपूर यांचं वडिलोपार्जित घर असून, 'कपूर हवेली' असं त्याचं नाव आहे. फाळणीपूर्व भारतात ब्रिटीशांच्या काळात म्हणजेच १९१८ ते २२ दरम्यान हे घर उभारण्यात आलं होतं. कपूर यांचे आजोबा दीवान बसेश्वरनाथ कपूर यांनी या घराचा पाया रचला होता. राज कपूर आणि त्यांचे काका त्रिलोक कपूर यांचा जन्म या घरातच झाला होता. 


तर, ज्येष्ठ  अभिनेते दिलीप कुमार यांचं जवळपास १०० वर्षे जुनं वडिलोपार्जित घरही किस्सा ख्वानी बाजार परिसरात असून, नवाझ शरिफ यांचं सरकार असताना म्हणजेच २०१४ मध्येच हे घर राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्यात आलं होतं.