वायुदलाच्या बेपत्ता विमानावरुन पाकिस्तानी अभिनेत्रीचा पंतप्रधान मोदींना टोला
मुळात हे विमान बेपत्ता झालंच नाही, तर....
नवी दिल्ली : मुळची पाकिस्तानी असणारी तरीही भारतात बऱ्यापैकी नावारुपास आणि प्रकाशझोतात आलेली एक अभिनेत्री गेल्या काही काळापासून चर्चांच्या या सत्रापासून दूर होती. पण, अचानकच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत तिने एक ट्विट केलं आणि पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडलं. वाद आणि ही अभिनेत्री हे तसं फार जुनं समीकरण. ती अभिनेत्री आहे वीणा मलिक.
काही दिवसांपूर्वीच भारतीय वायुदलाचं एएन ३२ हे विमान बेपत्ता झालं, त्याचविषयीचं एक ट्विट वीणाने केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'ऱडार'विषयीच्या वक्तव्यावर तिने या ट्विटमधून निशाणा साधला. मुळात हे विमान बेपत्ता झालंच नाही, तर त्याला रडारकडून मिळणारी दिशा समजली नसल्याचा वेगळाच मुद्दा तिने मांडला.
'भारतीय वायुदलाचं एएन ३२ हे क्रॅश झालंच नाही. मुळात ढगाळ वातावरण असल्यामुळे रडारला दिशा नीट हेरता आली नाही- सैन्यदल शास्त्रज्ञ, पीएम नरेंद्र मोदी', असं तिने या ट्विटमध्ये लिहिलं. सोबतच एक हसणारा इमोजीसुद्धा जोडला. बरं, हे असं काहीतरी बोलण्याची वीणाची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तिने विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्याविषयीसुद्धा आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. ज्यामुळे तिच्यावर अनेकांचाच रोष ओढवला होता.
वीणाने केलेलं हे ट्विट पाहता, त्यावर अनेकांनीच टीकेची झोड उठवली. त्यामुळे एकिकडे बेपत्ता विमानाचा शोध सुरु असतानाच वीणाच्या या बेताल वक्तव्यानेही अनेकांचं लक्ष वेधलं आहे. दरम्यान, सोमवारी आसामच्या जोरहाट येथून उड्डाण भरलेल्या या बेपत्ता विमानाचा शोध अद्यापही सुरुच आहे. या विमानात ७ अधिकारी, ६ एअर वॉरियर आणि १३ जण होते ज्यांचा सध्याच्या घडीला शोध घेण्यात येत आहे.