ही अनोखी गाठ कोणी बांधली.... डोळ्यात पाणी आणणाऱ्या नात्याची झलक?
`पांघरुण`... एक विलक्षण प्रेम कहाणी
मुंबई : काही नाती ही अव्यक्त असली तरीही त्या नात्यांचा ओलावा सारंकाही सांगून जातो. काही नाती ही अशा वळणावर सुरु होतात जिथे त्यांचं भविष्य सांगणं कठीण असतं. तर काही नात्यांना नाव देण्यासाठी शब्दही अपुरे पडतात. अशाच एका नात्यावर भाष्य करणारा मराठी चित्रपट लवकरत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
'नटसम्राट', 'काकस्पर्श' अशा चित्रपटांनंतर महेश मांजरेकर आणखी एक दमदार कथानक या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत.
'पांघरुण'... एक विलक्षण प्रेम कहाणी अशा शब्दांत त्यांनी या चित्रपटाचं वर्ण केलं आणि ट्रेलरच्या अवघ्या दोन अडीच मिनिटांनी हे सिद्धसुद्धा केलं. (Panghrun trailer)
अमोल बावडेकर, फुलवा खामकर, गौरी इंगवले, रोहित फाळके, विद्याधर जोशी, सुरेखा तळवळकर अशी तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या चित्रपटातून वेगळा काळ साकारला जाणार आहे.
विधवा विवाहानंतर एका ऐन तारुण्यातील मुलीच्या जीवनात होणारे बदल, तिनं स्वीकारलेल्या जबाबदाऱ्या आणि यातूनच पुढे घडणारं कथानक या साऱ्याची झलक चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहता येत आहे.
चित्रपटाची ही झलक जितकी पाहण्याजोगी आहे, तितकीच ती श्रवणीयसुद्धा आहे.
नेमकं हे कथानक कोणतं वळण घेतं आणि त्याला पूर्णविराम कुठे लागतो याचीच उत्सुकता हा ट्रेलर जागवत आहे.
झी स्टुडिओजतर्फे सादर केला जाणारा कलेचा हा नजराणा 4 फेब्रुवारी 2022 ला चित्रपटगृहांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.