नवी दिल्ली : गांधी आणि नेहरू कुंटुंबावर आक्षेपार्ह टिपणी केल्याप्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगीला राजस्थानच्या बूंदी न्यायालयाने २४ डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. परंतु आज न्यायालयाने तिचा जामीन मंजूर केला आहे. पायल रोहतगीला २५ हजारांच्या दोन साक्षीदारांच्या बाँडवर जामीन मिळाला. टेलिव्हिजनवरील रिऍलिटी शो 'बिग बॉस'मधून प्रसिद्धीझोतात आलेली बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी अनेकदा तिच्या काही ना काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पायलला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर बॉलिवूडची अभिनेत्री कोयना मित्रा आणि दिग्दर्शिका रीमा कागती तिच्यासाठी उभ्या राहिल्या होत्या. आपल्याला अटक झाल्याची माहिती स्वत: पायलने ट्विटच्या माध्यमातून दिली होती. परंतु आता न्यायालयाने तिचा जामीन मंजूर केला आहे. 



'मोतीलाल नेहरु यांच्यावर व्हिडिओ बनवल्यामुळे राजस्थान पोलिसांनी मला अटक केली आहे. हा व्हिडिओ मी गुगलवरुन माहिती मिळवून तयार केला होता. बोलण्याचं स्वातंत्र्य हा विनोद झाला आहे' असं ट्विट केलं होतं, पायलने ट्विटरवर राजस्थान पोलीस, पीएमओ आणि गृहमंत्री कार्यालयाला देखील टॅग केलं होतं.


१० ऑक्टोबर रोजी पोलिसांना पायल विरोधात तक्रार मिळाली होती. ही तक्रार काँग्रेस कार्यकर्ता चर्मेश शर्माने पायलविरूद्ध दाखल केली होती. नेहरू आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून टिपणी केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.