बॉलिवूडच्या `स्टंटमॅन`ला पंतप्रधान मोदींकडून आदरांजली
धोका पत्करणाऱ्यांसाठी ते नेहमी प्रेरणास्रोत राहोत...
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचे वडिल सुप्रसिद्ध साहसी दृश्य दिग्दर्शक वीरु देवगण यांच्या निधनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. मोदींनी वीरु देवगण यांच्या पत्नी विणा देवगण यांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान मोदींनी लिहिलेले पत्र अजय देवगणने त्याच्या ट्विटरवरुन शेअर केले आहे. मोदींनी लिहिलेल्या या पत्राबद्दल अजयने संपूर्ण कुटुंबाच्यावतीने त्यांचे आभार मानले आहेत.
पंतप्रधान मोदींनी २८ मे रोजी हे पत्र लिहिले. 'हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सर्वात्कृष्ट योगदानासाठी ओळखल्या जाणाऱ्या वीरु देवगण यांच्या जाण्याने अतिशय दुख: झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्वाला मोठे नुकसान झाले' असल्याचे मोदींना आपल्या पत्रात म्हटले आहे.
वीरु देवगण यांचे २७ मे रोजी विधन झाले. वीरु देवगण यांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत होता. तात्काळ त्यांना सांताक्रुझ येथील सूर्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची प्रकृती अधिक हालावत गेली आणि कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली.
वीरु देवगण यांनी कलाविश्वात मोलाचे योगदान दिले आहे. बॉलिवूडच्या या स्टंटमॅनने ८०हून अधिक चित्रपटांत अॅक्शन कोरियोग्राफर म्हणून काम केले. वीरु देवगण यांच्या जाण्याने कलाविश्वासह विविध क्षेत्रांतून शोक व्यक्त केला जात आहे.