प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शनला हत्या प्रकरणात अटक; पोलिसांनी फार्म हाऊसवरुन ठोकल्या बेड्या
प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपाला (Darshan Thoogudeepa) रेणुका स्वामी (Renuka Swamy) हत्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी फार्महाऊसवरुन त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
कन्नड चित्रटपसृष्टीत खळबळ माजवणारी एक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता दर्शन थुगुदीपाला (Darshan Thoogudeepa) हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दर्शनचा रेणुका स्वामी हत्या प्रकरणात (Renuka Swamy Murder) सहभाग असल्याचा संशय आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. बंगळुरुचे डीसीपी (पश्चिम) एस गिरीश यांनी सांगितलं आहे की, दर्शनला म्हैसूर येथील त्याच्या फार्म हाऊसवरुन ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान दर्शनची कथित प्रेयसी पवित्रा गौडाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
दर्शनला अटक केल्यानंतर चौकशी करण्यासाठी बंगळुरुला नेण्यात येणार आहे. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 10 जणांना अटक केली असून, त्यांची चौकशी केली जात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, पोस्टमॉर्टममध्येही रेणुका स्वामीची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं आहे. अटक करण्यात आले आहेत त्यांच्यातील एका आरोपीने दर्शनचं नाव घेतलं आहे. त्याच आधारे अभिनेत्यावर कारवाई करण्यात आली आहे. अभिनेता आरोपीच्या संपर्कात होता असा आरोप आहे.
काय आहे संपूर्ण प्रकऱण?
रेणुका स्वामीची 8 जून रोजी हत्या करण्यात आली होती. 9 जून रोजी बंगळुरू येथील कामाक्षीपाल्या येथील एका नाल्यात त्याचा मृतदेह सापडला होता. एका फार्मसी कंपनीत काम करणाऱ्या स्वामीने सोशल मीडियावर दर्शनची निकटवर्तीय असणाऱ्या अभिनेत्री पवित्रा गौडाला अश्लील संदेश पाठवले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
रेणुका स्वामी विवाहित होता. चित्रदुर्ग येथून त्याचं अपहरण केल्यानंतर कामाक्षीपाल्या येथे नेऊन हत्या करण्यात आली. भटके कुत्रे नाल्यातून मृतदेह बाहेर खेचत असल्याचं पाहिल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना कळवलं होतं. यानंतर पोलिसांनी कारवाई करत काही संशयितांना अटक केली. यानंतर हे धागेदोर दर्शनपर्यंत पोहोचले आहेत.
'तो माझा एकुलता एक मुलगा होता. गेल्यावर्षीच त्याचं लग्न झालं होतं. माझं शनिवारी त्याच्याशी बोलणं झालं. मला न्याय हवा आहे,' असं रेणुका स्वामीचे वडील म्हणाले आहेत. दरम्यान पोलिसांनी दर्शनच्या बंगळुरुमधील निवासस्थानी कडक सुरक्षा दिली आहे. दर्शनचा या हत्येत थेट सहभाग होता का याचा पोलीस तपास करत आहेत.
कोण आहे दर्शन थुगुदीपा?
दर्शन थुगुदीपा कन्नड चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहे. 2006 मध्ये त्याने स्वत:चं प्रोडक्शन सुरु केलं होतं. 2002 मध्ये मजेस्टिक चित्रपटातून त्याने पदार्पण केलं होतं. यानंतर कारिया, कलासीपाल्या, गाजा, नवग्रह, सारथी, बुलबूल, यजामना, रॉबर्ट अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये तो झळकला होता.
याआधीही अडकला होता वादात
दर्शनचं वादांशी जुनं नातं आहे. 2011 मध्ये घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप पत्नीने केला होता. 2021 मध्ये म्हैसूर येथील हॉटेलमध्ये मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला. यानंतर वेटरला 50 हजार देऊन प्रकऱण दाबण्यात आलं होतं. 2022 मध्ये एका निर्मात्याने आपल्याला धमकी दिला जात असल्याचा आरोप केला होता. तसंच जानेवारी 2023 मध्ये वनविभागाने त्याच्या फार्महाऊसवर छापा टाकला होता. बेकायदेशीर पद्धतीने ताबा घेतल्याचा आरोप त्याच्यावर होता.