मुंबई : महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांच्या संघर्षमयी प्रवास दाखवणारा ‘सत्यशोधक’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. यानिमित्ताने अकोला येथील सह्याद्री फाऊंडेशनच्या वतीने प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली, यात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक कंगोरे उलगडले, तसेच त्यांची प्रेमकहाणीही प्रेक्षकांना सांगितली. याच कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांनी म. फुलेंसारखी पगडी घालून आणि हातात मशाल घेऊन कार्यक्रमात प्रवेश केला, त्यामुळे उपस्थितांचे लक्ष आंबेडकरांकडे वेधले गेले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतीच सत्यशोधक चित्रपटाच्या निमित्ताने प्रकाश आणि अंजली आंबेडकर यांची मुलाखत घेतली. मुलाखतकार हे दुसरे तिसरे कोणी नसून या चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश जळमकर आणि म. फुलेंच्या भूमिकेतील अभिनेते संदीप कुलकर्णी होते. त्यामुळे या मुलाखतीला आणखीनच रंगत आली. त्यांच्यातील संवादामधून प्रकाश आंबेडकर आणि अंजली आंबेडकर यांची लव्हस्टोरी प्रेक्षकांसमोर आली. मुलाखतकारांनी त्यांचे भावनिक अंतरंग उलगडले. यावेळी अंजली यांनी सांगितले की, ''मित्रांनी आणि सहकाऱ्यांनी आमची मैत्री घडवून आणली आणि अशाप्रकारे मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि आम्ही विवाह केला, त्यामुळे आमचा मित्रांनी जमवलेला प्रेमविवाह आहे.'' 


प्रकाश आंबेडकर हे जनतेचे नेते असल्याने कायमच लोकांच्या गराड्यात असायचे, त्यामुळे आम्हाला भेटण्यासाठी वेळ मिळायचा नाही, मात्र आम्ही बऱ्याचदा ट्रेनमध्ये भेटायचो अशीही आठवण यावेळी अंजली यांनी सांगतिली. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान या दोघांच्या आवडत्या असल्याने त्यांचा एकही चित्रपट आम्ही चुकवला नाही, असे अंजली यांनी सांगितले.  
‘सत्यशोधक’ चित्रपटातही म. फुले आणि सावित्रीमाई यांची एक प्रेमळ आणि हळवी बाजू दाखवण्याचा दिग्दर्शकांचा आग्रह राहिला आहे. त्यामुळे समाजकार्यातही जोडीदाराचा पाठिंबा आणि साथ ही किती महत्त्वाची असते, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावर कळेलच. 


समता फिल्म्स निर्मित, अभिता फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि. प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित , संकल्पना - राहुल तायडे, वैशाख वाहुरवाघ सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूरवाघ हे आहेत, तर सहनिर्माते राहुल वानखडे, बाळासाहेब बांगर, हर्षा तायडे, प्रतिका बनसोडे, प्रमोद काळे हे आहेत. शिवा बागुल आणि महेश भारंबे हे कार्यकारी निर्माते आहेत. निर्मिती मध्ये निखिल पडघन, देवानंद मोहोड, मंगला वानखडे आणि निता गवई याचे मोलाचे योगदान आहे. विशेष म्हणजे रिलायन्स एंटरटेंनमेंट मार्फत हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल. ‘सत्यशोधक’ हा चित्रपट ५ जानेवारी, २०२४ रोजी प्रदर्शित होईल.