नवी दिल्ली : दक्षिण भारतीय अभिनेते आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रकाश राज आता राजकारणात येणार आहेत. मंगळवारी ट्विटर अकाउंटवर त्यांनी वर्षाच्या पहिल्या दिवशी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत याची घोषणा केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रकाश राज यांनी म्हटलं की, 'सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा... एक नवी सुरुवात... अधिक जबाबदारी. तुमच्या  सगळ्यांच्या पाठिंब्य़ाने अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक मी लढवणार आहे. मतदारसंघाची माहिती लवकरच देईन. अब की बार जनता की सरकार... संसदेत ही.



अभिनेते प्रकाश राज मोदी सरकारचे कट्टर विरोधक मानले जातात. २०१७ मध्ये गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर सोशल मीडियावर गौरी लंकेश यांच्यावर अभद्र वक्तव्य करण्यात आले. पंतप्रधान मोदींवर यावरुन टीका करत त्यांनी म्हटलं होतं की, अशा काही लोकांना पंतप्रधान फॉलो करतात. याबाबतीत पंतप्रधान कोणतीच भूमिका घेत नाहीत. या देशाचा नागरिक म्हणून पंतप्रधानांच्या मौन अवस्थेवर नाराज आहे.'


प्रकाश राज म्हणतात की, मी कोणत्याच पक्षाचा नाही. देशाचा नागरिक म्हणून पंतप्रधानांना आम्ही प्रश्न विचारु शकतो. प्रकाश राज स्पष्ट बोलणाऱ्यांपैकी मानले जातात. दक्षिण भारतात प्रकाश राज एक मोठं नाव आहे. आतापर्यंत त्यांना ५ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.


लिटिल जॉन, बुड्ढा होगा तेरा बाप, सिंगम, दंबग 2, मुंबई मिरर, भाग मिल्खा भाग, जंज़ीर, हिरोपंती अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे.