मुंबई : काही दिवसांपूर्वी सेन्सॉर बोर्डाच्या प्रमुखपदावरून पहलाज निहलानी यांना हटवून प्रसून जोशींची नेमणूक करण्यात आली. या बदलामुळे अनेक फिल्ममेकर्स आनंदात होते. आता चित्रपटांमध्ये होणारी अनावश्यक 'कट कट' आणि त्यातून वाढणारे वाद कमी होणार अशी निर्मात्यांची अपेक्षा होती. पण प्रसून जोशींनी नवे पद हाती घेतल्यानंतर नवे नियमही आणले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसून जोशींच्या नव्या नियमवलीमुळे सिने निर्माते आणि फिल्म मेकर्स यांची चिंता भविष्यात वाढण्याची शक्यता आहे.  फिल्म सर्टिफिकेट्सबाबत प्रसून जोशींनी नवा नियम आणला आहे. नव्या नियमानुसार, चित्रपटाच्या सर्टिफिकेट्स बाबत निर्मात्यांना कोणतीही पूर्व कल्पना दिली जाणार नाही. थेट ऑफिशियल सर्टिफिकेट देताना याबाबतचा खुलासा केला जाईल. 


आतापर्यंत निर्मात्यांना कोणते सर्टिफिकेट मिळेल याची माहिती दिली जात असे. त्यानुसार निर्माते त्यामध्ये बदल करू शकत असे तसेच वेळेवर चित्रपटाचे सर्टिफिकेट मिळणं शक्य होते. 'चित्रपटाशी निगडीत वादग्रस्त सीन आधीच समजला तर त्यानुसार बदल करणं शक्य होते. नव्या नियमानुसार आयत्या वेळेस सर्टिफिकेट मिळाल्यास आमचा वेळ वाया जाऊ शकतो. अनेकदा प्रदर्शनापूर्वी २-३ दिवस आधी सेंसॉर चित्रपट पाहतो. त्यानंतर आक्षेप आल्यास चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलावे लागेल. अशी प्रतिकिया एका निर्मात्याने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे.