मुंबई : प्रेम नाम है मेरा, प्रेम चोप्रा..... असं म्हणत एंट्री घेणाऱ्या प्रेम चोप्रा यांचा चेहरा कोणीही विसरु शकत नाही. हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिकांनाही मुख्य अभिनेत्यांच्या भूमिकांइतकीच लोकप्रियता देणाऱ्या कलाकारांच्या यादीतील हे एक नाव. अनेकदा तर, प्रेम चोप्रा ज्या चित्रपटांमध्ये असायचे त्या चित्रपटांतील मुख्य अभिनेत्याचीच भूमिका दुय्यम होऊन जात होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेम चोप्रा यांचा आज 86 वा वाढदिवस. 23 सप्टेंबर 1935 ला त्यांचा जन्म लाहोर येथे झाला होता. ज्यानंतर त्यांचं कुटुंब शिमला येथे वास्तव्यास आलं. पर्वतीय भागांमध्येच त्यांचं बालपण गेलं. सुरुवातीला शिमल्यात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठातून पदवी शिक्षण घेतलं. महाविद्यालयीन दिवसांपासूनच त्यांना नाटकांची आवड होती. ज्यामुळं पदवी शिक्षणानंतर त्यांनी मुंबई गाठली. अखेर संघर्षाच्या बऱ्याच वाटांचे वाटसरु झाल्यानंतर प्रेम चोप्रा यांना या कलाविश्वात स्थान मिळालं. हळुहळू हे नाव प्रकाशझोतातही येऊ लागलं. 


प्रेम चोप्रा यांच्या मते रुपेरी पडद्यावर तुम्ही ज्या भूमिका साकारता त्याचप्रमाणे समाजात तुमची प्रतिमा तयार होते. त्यांच्याप्रती समाजात नकारात्मकता दिसून येऊ लागली. पण, ही रसिकांचीच दाद आहे, असंच ते कायम मानतात. पण, त्यांच्या या नकारात्मक भूमिकेची झळ कुटुंबातही पोहोचली. मुलीसोबतच्या त्यांच्या नात्यात यामुळंच काहीसं अंतरही आलं होतं. 


एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, एकदा मुलीला त्यांनी चित्रपटाच्या प्रिमीयरला नेलं. कारण तिला आपल्या वडिलांचं काम पाहायचं होतं. पण, सिनेमागृहातून बाहेर आल्यानंतर मात्र मुलगी त्यांच्याकडे एकटक नजर रोखून पाहत होती. चित्रपट पाहतानाही ती बरीच शांत होती. अचानकच आपल्या वडिलांसोबत हे काय झालं या विचारानं ती सुन्न झाली होती. ते घरात हसूनखेळून आणि बाहेर असे का असतात असाच प्रश्न तिला पडला. ज्यानंतर मुलीची समजूत काढत आपण चित्रपटांमध्ये साकारलेल्या या भूमिका हे फक्त आपलं काम आहे, असं चोप्रा यांनी तिला समजावलं. 


आपण हे काम केलं तरच तुम्हाला चांगल्या शाळेत जाता येईल, मोठी कार घेता येईल असं म्हणत त्यांनी समजूत काढली तेव्हा कुठे तिच्या मनातील भीती कमी झाली. त्यामुळं रुपेरी पडद्यावर भल्याभल्यांना धडकी भरवणाऱ्या या अभिनेत्याला मात्र मुलीसोबतच्या नात्यात आलेल्या दुराव्यामुळंच धडकी भरली होती, असं म्हणायला हरकत नाही.