`तुला मालिकेतून का काढले?` प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितले कारण, म्हणाली...
काही दिवसांपूर्वी तिने या मालिकेतून एक्झिट घेतली. यानंतर अनेक चाहत्यांनी तिच्या पोस्टवर, इन्स्टाग्रामवर मेसेज करत मालिका का सोडली, याबद्दल विचारणा केली. आता तिने याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
गेल्या काही वर्षांपासून मालिका आणि कलाकारांमध्ये घट्ट नातं निर्माण झालं आहे. यामुळे मालिकेत होणाऱ्या बदलांबद्दल प्रेक्षक फारच सतर्क असतात. नुकतंच सन मराठी वाहिनीवरील एका प्रसिद्ध मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने अचानक एक्झिट घेतली. त्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता त्या अभिनेत्रीने सोशल मीडिया पोस्टद्वारे मालिका सोडण्याचे कारण सांगितले आहे. त्याबरोबरच तिने मालिकेतील सहकलाकारांचे आभारही मानले आहेत.
‘सन मराठी’ वाहिनीवरील प्रेमास रंग यावे ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेत अभिनेत्री अमिता कुलकर्णीने अक्षरा हे पात्र साकारले होते. मात्र काही दिवसांपूर्वी तिने या मालिकेतून एक्झिट घेतली. यानंतर अनेक चाहत्यांनी तिच्या पोस्टवर, इन्स्टाग्रामवर मेसेज करत मालिका का सोडली, याबद्दल विचारणा केली. नुकतंच अमिताने एका व्हिडीओद्वारे याचे उत्तर दिले आहे. अमिताने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने मालिका सोडण्याचे कारण सांगितले आहे. यावेळी ती म्हणाली, "मी प्रेमास रंग यावे या मालिकेतून एक्झिट घेतल्यावर मला खूप लोकांचे मेसेज आले. त्या सर्वांना मी सांगू इच्छिते की, मला या मालिकेतून काढून टाकण्यात आलेले नाही. मी वैयक्तिक कारणामुळे या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला."
"कुटुंब खूप महत्त्वाचे"
"माझे बाबा फार आजारी आहेत. त्यांना माझी गरज आहे. जर आयुष्यात तुमच्यावर कधी काम आणि कुटुंब याची निवड करण्याची वेळ आली तर कृपया कुटुंबाची निवड करा. कारण कुटुंब खूप महत्त्वाचे असते. आई-वडील, नवरा-बायको, मुलं यांच्याशिवाय आपण काहीच करु शकत नाही. त्यांच्या पाठिंब्यामुळे आपण पुढे जाऊ शकतो, मग जेव्हा त्यांना आपली गरज असते, तेव्हा आपण त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहायला हवं. त्यामुळेच मी हा निर्णय घेतला", असेही अमिता यावेळी म्हणाली. त्याबरोबरच अमिताने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत सहकलाकारांचेही आभार मानले.
अमिताने मानले सहकलाकारांचे आभार
"2023 मध्ये माझ्या आयुष्यात घडलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे प्रेमास रंग यावे ही मालिका मला मिळाली. त्यासाठी मी काही लोकांचे मनापासून आभार मानते, ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला या अक्षराला घडवलं. खूप खूप धन्यवाद. चंद्रकांत गायकवाड, अनिल राऊत, मंदार कुलकर्णी तुमच्या पाठिंबाशिवाय ही अमिता अक्षराचं पात्र कधीच करु शकली नसती. तुमच्यामुळे इतकं चांगलं काम करु शकले. त्यासाठी मनापासून आभार.
समीरा गुजर, रोहित शिवलकर, शुभांगी, किरण डांगे, रुपा शिरसाट, अंकिता नाईक, सायली सांभरे खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही मला समजून घेतलात, सांभाळून घेतलात, म्हणून आपण एकत्र काम करु शकलो. गौरी कुलकुर्णी तुला सगळं माहिती आहे, त्यामुळे इथे फार बोलणार नाही. पण खूप धन्यवाद. तुझ्याकडून मी खूप काही शिकले. आपण भांडलो, रडलो, हसलो, एका ताटात जेवलो, खूप मस्ती केली. आय लव्ह यू.
लीना आठवले परत कधीतरी कोणत्या तरी मालिकेत एकमेकांना त्रास देऊया. ओम जंगम तू खूप भारी अभिनेता आहेस आणि माणूस म्हणूनही खूप खूप कमाल आहेस. तुला मालिकेत खूप मारलंय मी, त्यासाठी मला माफ कर आणि तू मला खूप त्रास दिलास, त्यासाठी आय हेट यू. परत लवकरच भेटू. रवी कुलकर्णी आपलं नातं खूप जुनं आहे. आपलं बॉंडिंग वेगळं आहे. आपण आधीच्या मालिकेत एकत्र होतो आणि आता योगायोगाने भेटलो. त्यामुळे आता खात्र पटलीय की कायम एकत्र राहुया आणि अजून छान काम करुया.
सचिन माने, तुझ्यासाठी काय बोलू. तू खरंच हिरा आहेस. तू सेटवर सर्वात पहिला मित्र आहेस, तू मला भेटलास, त्यासाठी तुझे धन्यवाद. तू मला काम करताना बऱ्याच गोष्टीत समजवत होतास, शिकवत होतास, हे कायम लक्षात ठेवेन. परत कधीतरी आयुष्यात एकत्र काम करण्याची माझी इच्छा आहे. त्याबरोबरच प्रेक्षकांचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप प्रेम दिलात. तुमच्या प्रेमाशिवाय ही अमिता आणि अक्षरा काहीच करु शकली नसती", असे अमिताने यावेळी म्हटले आहे.
दरम्यान सध्या ‘प्रेमास रंग यावे’ या मालिकेत अमिताच्या ऐवजी अभिनेत्री अमृता फडके ही अक्षरा हे पात्र साकारत आहे. तिच्या या पात्रालाही प्रेक्षक तितकाच प्रतिसाद देताना दिसत आहेत.