पंतप्रधान मोदी, अमित शाहंकडून इरफान खानला श्रद्धांजली
दिग्गज अभिनेता इरफान खानच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा परसली आहे.
नवी दिल्ली : दिग्गज अभिनेता इरफान खानच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा परसली आहे. बुधवारी मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये इरफानने शेवटचा श्वास घेतला. मागच्या एका वर्षापासून इरफानला न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर झाला होता. इरफान ५३ वर्षांचा होता. इरफान खानच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला आहे.
'इरफान खानचं निधनाने चित्रपट आणि रंगमंचाच्या दुनियेचं नुकसान झालं आहे. वेगवेगळ्या माध्यमांमधून केलेल्या अष्टपैलू अभिनयाबाबत इरफान कायमच लक्षात राहतील. त्यांचे कुटुंब, मित्र आणि चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. मृतात्म्यास श्रद्धांजली,' असं ट्विट मोदींनी केलं आहे.
'इरफान खान यांच्या मृत्यूची बातमी ऐकून दु:खी आहे. इरफान खान अष्टपैलू अभिनेते होते. आपल्या अभिनयाने त्यांनी जागतिक किर्ती आणि ओळख मिळवली होती. आपल्या चित्रपटसृष्टीसाठी इरफान संपत्ती होते. देशाने एक उत्तम अभिनेता आणि चांगला माणूस गमावला आहे. त्यांचं कुटुंब आणि चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे,' असं गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
अचानक तब्येत बिघडल्यामुळे इरफान खानला सोमवारी मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये इरफान खानला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं. इरफानला कोलोन इंफेक्शन (पोटाचं संक्रमण) झाल्याचं सांगण्यात आलं.
इरफानचा जन्म ७ जानेवारी १९६७ साली जयपूरमध्ये मुस्लिम पठाण कुटुंबात झाला होता. इरफानचं पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान होतं. २०१८ साली इरफानने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आपल्या आजाराबाबत खुलासा केला होता. न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर झाल्याचं इरफानने सांगितलं होतं. इरफान न्यूयॉर्कमध्ये उपचार घेऊन फेब्रुवारी २०१९ साली भारतात परतला. यानंतर मागच्या महिन्यात १३ मार्चला इरफान अंग्रेजी मीडियम या शेवटच्या चित्रपटात दिसला.