मुंबई : प्रियांका चोप्रा, बिपाशा बसू, काजोल यांसारख्या अभिनेत्रींनी वर्णभेदाला चित्रपटसृष्टीत काही स्थान नाही, हे स्पष्ट केले. तरी देखील अनेक बॉलिवूड मंडळी फेअरनेस क्रीमच्या जाहिराती करताना दिसून येतात. याबद्दल अभिनेता अभय देओलने काही महिन्यांपूर्वी अशा जाहिराती करणाऱ्या कलाकारांवर शाब्दिक हल्ला चढवला होता. याच पार्श्वभूमीवर ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने तिची भूमिका स्पष्ट केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘वोग’ या फॅशन मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने फेअरनेस क्रिमबद्दल तिचं मत मांडलं. फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीत काम केल्याचा तिला  पश्चाताप असल्याचंही तिने सांगितलं. ‘गव्हाळ वर्णाच्या बऱ्याच मुलींना अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात. अनेकदा लोक बिचारी म्हणून बघतात तर कधी टिंगल उडवतात. 


आठवड्याभरात त्वचा उजळण्याचा दावा या फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींमध्ये केला जातो. मी देखील किशोरवयात अशा क्रिम्स वापरायचे. त्यानंतर जवळपास २० वर्षांची असताना मी एका फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीत काम केले. त्यात मी आपल्या वर्णाबद्दल न्यूनगंड असणाऱ्या मुलीची भूमिका साकारली होती. 


पण जाहिरात पाहिल्यानंतर 'मी हे काय केले... ?' अशी भावना माझ्या मनात आली. त्यानंतर मात्र मी माझ्या वर्णाविषयी, दिसण्याविषयी मोकळेपणाने आणि अभिमानाने बोलू लागले. कारण मला माझा वर्ण खूप आवडतो”, असे प्रियांका म्हणाली.



आपली ठाम मतं मांडून प्रियांका नेहमीच अनेकांची मने जिंकून घेते. तिच्या नव्या फोटोशूटमुळे सध्या सोशल मीडियावर तिच्या नावाची चर्चा सुरु आहे. 'वोग मॅग्झिन’च्या कव्हर फोटोमधील प्रियंकाच्या अदांनी अनेकांना घायाळ केले.