प्रियंकाला आणखी एक पुरस्कार; `यूनीसेफ`कडून लवकरच सन्मान
काही दिवसांपूर्वीच यूनीसेफकडून प्रियंकाची गुडविल अॅंम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली.
नवी दिल्ली : बॉलिवूड देसी गर्ल प्रियंका चोप्रा नेहमीच कधी तिच्या वैयक्तिक तर कधी तिच्या सोशल लाइफमुळे चर्चेत असते. आता प्रियंका एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच यूनिसेफकडून प्रियंकाची गुडविल अॅंम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र आता भारतीय अभिनेत्री प्रियंका चोप्राला यूनीसेफकडून डिसेंबर महिन्यात यूनीसेफच्या स्नोफ्लेक बॉल सोहळ्यात 'डॅनी केये ह्यूमनटेरियन' या पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. खुद्द प्रियंकाने याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
या सोहळ्याचं तीन डिसेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये आयोजन केलं जाणार आहे. यूनीसेफसाठी त्यांचं काम अतिशय महत्त्वाचं असल्याचं प्रियंकाने म्हटलंय. 'जगातील संपूर्ण मुलांकडून यूनीसेफसह मी करत असलेलं काम माझ्यासाठी सर्व काही आहे. जगातील सर्व मुलांना शांती, स्वातंत्र्य आणि शिक्षणाचा अधिकार आहे' असंही प्रियंकाने म्हटलंय.
प्रियंका २००६ पासून यूनीसेफशी जोडली आहे. २०१० आणि २०१६ मध्ये प्रियंकाला बाल हक्कांसाठी राष्ट्रीय आणि जागतिक यूनीसेफ गुडविल अॅंम्बेसेडर म्हणून नियुक्त केलं होतं. प्रियंका पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, महिलांचे अधिकार, लैंगिक समानता याबाबत नेहमीच बोलत असते.
प्रियंकाने नुकतंच फरहान अख्तरसोबत सोनाली बोस यांच्या 'द स्काय इज पिंक' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे.