रेल्वेस्टेशनातील फलाट म्हणजे... पु.ल. देशपांडेंनी केलेलं हे वर्णन वाचताना हसू आवरणार नाही...
Pu La Deshpande Death Anniversary : दिवसभराचा क्षीण घालवणारं काहीतरी वाचायचंय? पुलंनी रेल्वे फलाटाचं केलेलं हे वर्णन वाचा. पाहताक्षणी म्हणाल, हे असंच असतंय... काय कमाल लिहिलंय...!
Pu La Deshpande Death Anniversary : मराठी साहित्यामध्ये डोकावून पाहिलं, तर काही व्यक्ती, काही लेखत, काही साहित्यकार कायमच अग्रस्थानी दिसायचे आणि कायमच दिसत राहतील. या भल्यामोठ्या यादीतलं एक नाव म्हणजे, पु.ल. देशपांडे. 'व्यक्ती आणि वल्ली', 'अपूर्वाई', 'वंग- चित्रे', 'रसिकहो' या आणि अशा अनेक विषयांवर बेतलेल्या पुस्तकांच्या माध्यमातून पुलं वाचकांच्या भेटीला आले. पुलं, हे मुळात इतकं वेगळं समीकरण होतं, की ते ज्या व्यक्तीला उमगेल त्याला परिसस्पर्शाची अनुभूती झाल्यावाचून राहणार नाही. याच पु.ल. देशपांडे यांचा 12 जून रोजी स्मृतीदिन.
पुलंनी जगाचा निरोप घेऊन काळ लोटला असला तरीही त्यांच्या साहित्याच्या निमित्तानं ते आजही प्रत्येक पिढीसोबत आहेत असं म्हणणं अतिशयोक्ती नाही. पुलं खऱ्या अर्थाने ट्रॅव्हल ब्लॉगर, ट्रॅव्हल व्लॉगर होते असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या पूर्वरंग, अपूर्वाई आणि वंग-चित्रे या प्रवासवर्णांमधून त्यांचं भटकंतीवरील प्रेम आणि निरीक्षण फार समर्पकरित्या मांडलं गेलं. पुलंच्या याच प्रवासवर्णनांपैकी वंग-चित्रेमध्ये त्यांनी फलाटाचं वर्णन केलं.
हेसुद्धा वाचा : Ashadhi Ekadashi 2024 : एकटे किंवा समुहाने... आषाढीनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्यांसाठी एसटीची खास सुविधा आणि सवलती
वयाच्या 50 व्या वर्षी पुलं बंगाली भाषा शिकण्यासाठी पश्चिम बंगालला पोहोचले होते असं म्हटलं जातं. त्याच प्रवासादरम्यानचा एक अनुभव त्यांनी फलाटाच्या निमित्तानं टीपला. त्याचंच हे वर्णन... जसं च्या तसं... वंग-चित्रे या प्रवासवर्णातून..
''...आम्ही बंगालच्या दिशेनं निघालो. अलाहाबादमार्गे बरद्वानला जाणारी गाडी धरायची होती. रिझर्वेशन वगैरे सर्वकाही यथासांग होतं. तरीही, आजवरच्या शिरस्त्याला धरून गाडी सुटायच्या दीड तास आधी येऊन बोरीबंदरला पोहोचलो. फलाटावर त्यावेळी फक्त काही हमाल, पोर्टर, मी, माझी पत्नी आणि आमच्याबरोबर आलेले आमचे दोनतीन स्नेही यांखेरी कोणी नव्हते. गाडी फलाटाला लागत होती. त्याअर्थी ड्रायव्हर आला असाला. काही वेळाने स्टेशन आळोखे पिळोखे देऊन उठू लागले. हळुहळू जागे होणारे थिएटर, रेल्वे स्टेशन किंवा मोठे शहर वगैरे पाहायला फार मजा येते. रेल्वे फलाटाचे तर, एरवी गरीब गाईसारख्या दिसणाऱ्या बाया अंगात देवीबिवीता संचार होऊन घुमू लागल्यावर जशा हांहां म्हणता थयथयाट करतता तसे असते. अजगरासारखे शांतपणाने आडवे पडलेले फलाट गाडी सुटायचा मुहूर्त अतिसमीर आला की घुमायला लागतात. निळ्या कपड्यातले पोर्टर, लाल डगलेवाले हमाल, खाकी कपड्यातले रेल्वे कर्मचारी, सफेद कपड्यातले एसएम, एएसएन असा हा भगतगण या टोकापासून त्या टोकापर्यंत चकरा मारायला लागतो. डब्याच्या टपावर चढून पाणी भरायला सुरुवात होते.
डब्यातले पंथे, बत्त्या ह्यांची डागडुजी सुरु होते. प्रवासी मंडळी आणि हमाल यांचा लपंडाव, मग हमालीच्या पैशावरून हुतूतू असे खेळसुसु होतात. ऐटबाज पॅसेंजर गावठी पाशिंजराकडे तुच्छतेने पाहू लागतात. आईपाबांची बोटे सोडून वांड कारटी आईस्क्रीम- चॉकलेटवाल्यांच्या ढकलगाड्यांमागे धावू लागतात. रिझर्वेशनची यादी बाळगणाऱ्या कंडक्टरचा पाठलाग सुरु असतो... गाडी सुटायच्या वेळेला तर ही लय इतकी बेहद्द वाढते की सुनेच्या जाचाला वैतागून सासूने बोचके बांधून पाय आपटीत घर सोडून काशीयात्रेला जावे तशी ती आगगाडी शिट्ट्यांचा आक्रोश करीत फलाट सोडून धुसफूस धुसफूस करीत निघते. आपल्या देशाची संस्कृती, देशबांधवांचा स्वभाव वगैरे काय दर्जाचा आहे याचे खरे दर्शन भारतीय रेल्वेच्या फलाटावर होते. भारतीय नेत्यांप्रमाणे फलाटावरच्या अनुयायांचा स्थायीभावदेखील 'भांबावून हैराण होणे' हाच आहे. जो बघावा तो हैराण. कुणी हमाल हरवला म्हणून, कुणी तिकीट हरवले म्हणून, कुणी पाकिट मारले म्हणून, कुणी आपल्या रिझर्व जागेवर दुसराच माणूस तळ ठोकून बसलाय म्हणून, कुणी कंडक्टर सापडत नाही म्हणून, कुणी गाडी सुटायची वेळ झाली तरी निरोप देणारी माणसे आली पण जाणारी माणसे आली नाहीत म्हणून, कुणी डब्यातला पंखा चालत नाही म्हणून, कुणी संडासाच्या नळाला पाणी नाही म्हणून... नाना कारणांनी हैराण झालेल्या आपल्या देशाचे रेल्वे फलाट हे आदर्श मॉडेल आहे.''