अल्लू अर्जुनच्या घरावर कोणी केला टोमॅटो- दगडांचा मारा? पुतळाही जाळला; घडला प्रकार पाहून चाहत्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
Pushpa 2 Star Allu Arjun : `पुष्पा 2` हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता अभिनेता अल्लू अर्जुन बऱ्याच वादांमध्ये अडकल्याचं पाहायला मिळत आहे.
Pushpa 2 Star Allu Arjun : दाक्षिणात्य कलाविश्वामध्ये कमालीची लोकप्रियता असणाऱ्या अभिनेता अल्लू अर्जुन याच्यामागे असणाऱ्या अडचणी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. अभिनेत्याचा 'पुष्पा 2' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू ओढावला. ज्यानंतर अभिनेत्याच्या अडचणींमध्ये भर पडल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनीसुद्धा या मेगास्टारवर कारवाई केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यानच्या काळात सोशल मीडियावर एकाएकी अभिनेत्याच्या विरोधात सूर आळवणाऱ्यांचा आकडा वाढत असल्याचं स्पष्ट झालं.
अल्लू अर्जुनच्या घराबाहेर विरोध प्रदर्शन
रविवारी उस्मानिया विद्यापीठातील काही विद्यार्थी नेत्यांनी या अभिनेत्याच्या घराबाहेर एकच गोंधळ घातला. दरम्यान अभिनेत्याच्या घरावर हल्ला करण्यात आला. इतक्यावरच न थांबता इथं त्याचा पुतळाही जाळण्यात आला. काहींनी त्याच्या घरावर टोमॅटो आणि दगडांचा मारा केला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं 8 जणांना ताब्यात घेतलं.
हेसुद्धा वाचा : भीषण! पुण्यात मद्यधुंद डंपर चालकाने 9 जणांना चिरडलं; तिघांचा मृत्यू
सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरली आणि पाहता पाहता चाहत्यांनी अभिनेत्याची साथ देणाऱ्या पोस्ट करण्यास सुरुवात केली. X वर सोमवारी सकाळपासून Stop Cheap Politics On ALLU ARJUN हा टॅग ट्रेंड करू लागला. अभिनेत्याच्या विरोधात प्रदर्शन करणाऱ्यांविरोधात चाहत्यांनी आवाज उठवला आणि अभिनेत्याला या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये जाहीर साथ दिली. अभिनेत्याला राजकारणापासून दूर ठेवा, अशीच मागणी चाहत्यांनी उचलून धरली. काही चाहत्यांनी रस्त्यांवर उतरत अल्लू अर्जुनला पाठिंबा देणारे फलक झळकवले.
हल्लापूर्वीच अभिनेता काय म्हणाला होता?
घरावर हल्ला होण्यापूर्वीच अल्लू अर्जुननं एक सोशल मीडिया पोस्ट केली होती. यामध्ये त्यानं काहीजणांविरोधात आपण कारवाईचं पाऊल उचलणार असल्याचं सांगत इशारावजा संदेश दिला होता. 'मी चाहत्यांना आवाहन करु इच्छितो की, त्यांनी आपल्या भावना जबाबदारीनं व्यक्त कराव्यात. ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं व्यक्त होताना कुठंही चुकीच्या भाषेचा आधार घेऊ नका. स्वत:ला माझे चाहते म्हणवत फेक आयडी किंवा प्रोफाईलनं कोणीही मेसेज करणार असेल तर त्यांच्याविरोधात सक्तीची कारवाई केली जाईल.' असं त्यानं या पोस्टमधून स्पष्ट केलं होतं.