लैंगिक अत्याचार प्रकरणी विकास बहलला `क्लीन चीट`
त्यामुळे आता विकासला.....
मुंबई : #MeToo मोहिमेअंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आलेल्या दिग्दर्शक विकासबहल याला या प्रकरणी क्लीन चीट देण्यात आली आहे. ज्य़ामुळे परिणामी विकास पुन्हा एकदा हृतिक रोशनची मुख्य भूमिका असणाऱ्या 'सुपर ३०' या चित्रपटात त्याचा प्रवेश झाला आहे. विकासला न्यायालयाकडून नव्हे तर, या चित्रपटाच्या निर्मिती संस्थेकडून म्हणजेच रिलायन्स एंटरटेन्मेंटच्या अंतरिम समितीकडून क्लीन देण्यात आली आहे.
रिलायन्स एंटरटेन्मेंट समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिबाशीष सरकार यांनी याविषयीची माहिती एका पत्रकाद्वारे दिली. 'अंतरिम तक्रार निवारण समितीकडून विकासला क्लीन चीट देण्याच आल्याची बाब खरी आहे. त्यामुळे आता विकासला क्लीन चीट मिळाल्यामुळे 'सुपर ३०' या चित्रपटातील योगदानासाठी त्याला पुन्हा संधी देण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय नाही' असं ते म्हणाले.
'मुंबई मिरर'च्या वृत्तानुसार तक्रारकर्त्यांना अनेकदा समितीने तपास प्रक्रियेदरम्यान हजर राहण्यास सांगितलं. पण, त्या हजर राहिल्याच नाहीत. परिणामी या प्रकरणाशी संबंधित इतर काहीजणांची चौकशी करण्यात आली, ज्या आधारे विकासला 'क्लीन चीट' देण्यात आली.
'क्वीन' फेम दिग्दर्शक विकास बहल याच्यावर एका महिलेने २०१५ दरम्यान गोव्याच्या एका दौऱ्यात आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. इतकच नव्हे तर, अभिनेत्री कंगना रानौत आणि 'फँटम फिल्म्स'मधील विकासचे साथीदार असणाऱ्या अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांनीही त्याच्या या गैरव्यववहाराप्रकरणी वक्तव्य केलं होतं. दरम्यान, सध्याच्या घडीला विकासला 'क्लीन चीट' मिळाल्यामुळे येत्या काळात त्याच्या वाटेतील काही अडचणी दूर झाल्या आहेत.
अवघ्या काही दिवसांनीच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'सुपर ३०' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये श्रेयनामावलीत अखेर विकासला दिग्दर्शक म्हणून श्रेय देण्यात येणार आहे.