`क्वीन हरीश`चा अपघाती मृत्यू; ईशा अंबानीच्या विवाहसोहळ्यातील परफॉर्मन्सने वेधलं होतं लक्ष
पाहा ईशा अंबानीच्या विवाहसोहळ्यातील तो व्हिडिओ
जोधपूर : लोककलेचा वारसा जपत त्या कलेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आणि संपूर्ण जगात आपल्या कलेच्या बळावर वेगळी अशी ओळख प्रस्थापित करणाऱ्या क्वीन हरीश यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या अपघातात हरीश यांच्यासह इतरही तीन कलाकारांचा मृत्यू झाला आहे. तर, पाच जण जखमी झाल्याचं कळत आहे. रविवारी सकाळी जोधपूर येथे हा अपघात झाला होता.
जैसलमेरहून अजमेरच्या दिशेने निघाले असता जोधपूर महामार्गाजवळ असणाऱ्या कपरडा गावाकडे त्यांचा अपघात झाला. एका कार्यक्रमाच्याच निमित्ताने ही सर्व मंडळी निघालेली होती. दरम्यान, या अपघाताची चौकशी सुरू आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही हरीश आणि इतर कलाकारांच्या निधनाचा शोक व्यक्त केला आहे.
कोण आहे क्वीन हरीश?
हरीश कुमार यांची क्वीन हरीश अशीच त्यांची ओळख सर्वत्र आहे. पुरुष असूनही मोठ्या नजाकतीने त्यांनी राजस्थानी नृत्यकलेला साऱ्या जगासमोर सादर केलं. रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या मुलीच्या, म्हणजेच ईशा अंबानीच्या लग्नसोहळ्यातील परफॉर्मन्समुळे ते अधिकच चर्चेत होते.
पाहा त्याच सोहळ्यातील त्यांचा एक व्हिडिओ
मुळच्या जैसलमेरच्या असणाऱ्या हरीश कुमार यांनी बी- टाऊनमध्येही त्यांचं स्थान तयार केलं होतं. परदेशी पर्यटकांनाही त्यांच्या या कलेचं सादरीकरण आवडत असे. राजस्थानी नृत्य प्रकारातील चकरी, भवाई, तराजू, तेरह ताली, घूमर, चरी, कालबेलिया या नृत्यप्रकारात त्यांनी महारथ मिळवली होती. हरीश यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांना अनेकांनीच श्रद्धांजली वाहिली असून, त्यांच्या नृत्यकेलेचे काही व्हिडिओही शेअर केले जात आहेत.